"फाईल हलते पैशाने, मंत्रालय चालते हप्त्याने.."
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्र विधिमंडळाच्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (२४ फेब्रुवारी २०२६), महाविकास आघाडीच्या (मविआ) नेत्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले.
१२ फेब्रुवारी २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंत्रालयातील झिरवळ यांच्या कार्यालयावर धाड टाकून राजेंद्र ढेरंगे नावाच्या कारकुनाला ३५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली होती. या कारवाईनंतर एसीबीने मंत्र्यांचे कार्यालय सील केले होते.
यावेळी विरोधकांनी "फाईल हलते पैशाने, मंत्रालय चालते हफ्त्याने", "मंत्रालयात एकच हिरवळ, त्यांचे नाव झिरवळ झिरवळ", "भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो" अशा घोषणा दिल्या.
याच अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी झिरवाळ यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले. उद्या माझ्या कार्यालयात जर एखादी तक्रार मिळाली तरीही रेड होईल. त्यामुळे त्याचा देवेंद्र फडणवीसांची संबंध नसतो आणि नरहरी झिरवाळांशीही संबंध नसतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
केबिनमध्ये असा व्यवहार झाला तर त्याला मंत्र्याचा आशीर्वाद आहे असे समजण्याचे कारण नाही. अद्यापपर्यंत झिरवाळ यांच्या संदर्भाने कोणतेही पुरावे मिळून आले नाहीत, असेही फडणवीस म्हणाले.
विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवर नरहरी झिरवाळ यांना विचारले असता, जर माझ्यापर्यंत या प्रकरणाचे धागेदोरे येत असतील आणि ते सिद्ध झाले तर त्याची जबाबदारी घेण्यास मी तयार असेन. आरोप सिद्ध झाले तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असे झिरवाळ म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.