Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीतील बलगवडेत मतदारांचा मतदानावर बहिष्कारसौर ऊर्जा प्रकल्पसाठी झाडे तोडल्याप्रकरणी अनोखा निषेध

सांगलीतील बलगवडेत मतदारांचा मतदानावर बहिष्कार
सौर ऊर्जा प्रकल्पसाठी झाडे तोडल्याप्रकरणी अनोखा निषेध

सांगली : खरा पंचनामा

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात तीव्र भूमिका घेत तासगाव तालुक्यातील बलगवडेतील सर्व मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकत अनोखा निषेध नोंदवला. ग्रामस्थांनी याबाबत आधीच इशारा दिला होता आणि आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही गावातील मतदारांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवली.

बलगवडे गावात सौर प्रकल्पासाठी हजारो झाडांची तोड करण्याचा प्रस्ताव असून यामुळे पर्यावरण, पाणीसाठा आणि गावाच्या भवितव्यावर गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील गायरान व परिसरात असलेली अंदाजे १२ ते १५ हजार झाडे ही पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी यापूर्वी तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांनी या बैठकीवर बहिष्कार घालत आपला ठाम विरोध नोंदवला होता. प्रशासनाने योग्य भूमिका न घेतल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी गावात बेमुदत उपोषण सुरू केले होते. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी प्रशासन, माजी खासदार संजय पाटील व माजी आमदार सुमन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होऊन प्रकल्पाची जागा बदलण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर तात्पुरते आंदोलन मागे घेण्यात आले होते.

मात्र बैठकीनंतर अवघ्या दोन दिवसांत कंपनीकडून पोलिस संरक्षणात पुन्हा वृक्षतोड सुरू करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमताने आगामी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.

आज निवडणुकीच्या दिवशी तहसीलदार अतुल पाटोळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व प्रशासनाच्या पथकाने बलगवडेत भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र चर्चेअंतीही ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले. "जोपर्यंत सौर प्रकल्पासाठीची वृक्षतोड पूर्णपणे थांबवली जात नाही आणि प्रकल्पाची जागा बदलण्याबाबत लेखी निर्णय होत नाही, तोपर्यंत मतदानासह कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नाही," अशी स्पष्ट भूमिका ग्रामस्थांनी मांडली. या पार्श्वभूमीवर प्रशासन पुढील भूमिका काय घेणार, ग्रामस्थांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.