Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

HSRP नसलेल्या वाहनांवर १८ फेब्रुवारीपासून कडक कारवाईपरिवहन आयुक्तांचे संकेत

HSRP नसलेल्या वाहनांवर १८ फेब्रुवारीपासून कडक कारवाई
परिवहन आयुक्तांचे संकेत

मुंबई : खरा पंचनामा

वाहनांच्या सुरक्षेसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या 'हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट' (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत संपून महिना उलटला असतानाच राज्य परिवहन विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे. १८ फेब्रुवारीपासून ज्या वाहनांवर नवीन HSRP नंबर प्लेट नसेल, त्यांच्यावर थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले आहेत. अंतिम मुदतीनंतरही मोठ्या प्रमाणात वाहनधारकांनी या नियमाकडे दुर्लक्ष केल्यामुळे विभागाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, प्रशासनाने दिलासा देत १५ दिवसांचा 'ग्रेस पिरीयड' जाहीर केला आहे. ज्या वाहनधारकांनी ३१ डिसेंबर २०२५ पूर्वी HSRP साठी ऑनलाइन नोंदणी केली आहे, मात्र अद्याप प्रत्यक्ष नंबर प्लेट बसवून घेतलेली नाही, त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

"वेळेत नोंदणी केलेल्या नागरिकांना संधी मिळावी, म्हणूनच अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे," असे भिमनवार यांनी स्पष्ट केले. मात्र, ३१ डिसेंबरनंतर नोंदणी केलेल्या किंवा अजूनही नोंदणी न करणाऱ्या वाहनधारकांना १,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील स्थिती विशेष चिंताजनक असल्याचे चित्र आहे. या भागात एकूण २४ लाखांहून अधिक पात्र वाहने असताना, केवळ सुमारे ८.५७ लाख वाहनधारकांनीच HSRP साठी नोंदणी केली आहे.

म्हणजेच जवळपास ६५ टक्के वाहने अजूनही जुन्याच नंबर प्लेटवर रस्त्यावर धावत आहेत. राज्यभरात एक कोटीहून अधिक वाहने अद्याप HSRP शिवाय असल्याचेही समोर आले आहे.

१८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या तपासणीत केवळ नंबर प्लेटपुरते मर्यादित न राहता, वाहनांची इतर कागदपत्रेही तपासली जाणार आहेत. नोंदणी प्रमाणपत्र (RC), वाहन विमा, पीयूसी प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांची पडताळणी केली जाईल. यापैकी कोणतेही कागदपत्र नसल्यास दंडाची रक्कम वाढू शकते, असा इशाराही परिवहन विभागाने दिला आहे.

दरम्यान, नंबर प्लेट बसवणाऱ्या फिटमेंट सेंटर्स आणि अधिकृत शोरूम्ससमोरही अडचणी वाढल्या आहेत. अनेक वाहनधारक अपॉइंटमेंट घेऊनही वेळेवर येत नसल्याने तयार नंबर प्लेट्स सेंटर्समध्ये साठून राहिल्या आहेत. प्रशासनाने वाहनधारकांना तात्काळ HSRP बसवून घेण्याचे आवाहन केले असून, अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.