राज्यसभेवर हॅटट्रीक !
उमेदवारी जाहीर होताच शरद पवारांची भावनिक पोस्ट
मुंबई : खरा पंचनामा
राज्यसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यामध्ये राजकीय हालचालींना वेग आला होता. अखेर महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून सहा आणि महाविकास आघाडीकडून एक उमेदवार देण्यात आला आहे. यामध्ये भाजपने विनोद तावडे, रामदास आठवले, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शिंदे गटाकडून ज्योती वाघमारे आणि अजित पवार गटाकडून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून शरद पवारांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय तिन्ही पक्षांनी मिळून घेतला आहे.
शरद पवार यांना सहा दशकांचा राजकीय अनुभव असून आता तिसऱ्यांदा ते राज्यसभेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीमध्ये या जागेवर मोठा राजकीय वादंग झाल्यानंतर अखेर शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. शरद पवार यांचा राजकीय अनुभवाच्या जोरावर सर्वात कमी आमदार असून देखील महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला संधी देण्यात आली आहे. यानंतर आता शरद पवार यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन राजकीय प्रवासाचा आलेख मांडला. तसेच महाराष्ट्रातील जनतेला भावनिक आवाहन केले आहे.
जेष्ठ नेते शरद पवार यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भावनिक पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, '१९६७ पासून माझा लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू झाला आणि आजपर्यंत तो अखंडपणे सुरू आहे. हा प्रदीर्घ प्रवास केवळ माझा नसून महाराष्ट्राच्या जनतेचा आहे, कारण त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे आणि पाठिंब्यामुळेच हा संसदीय प्रवास कधीही खंड न पडता पुढे सुरू ठेवणे मला शक्य झाले.'
'१९६७ मध्ये प्रथम महाराष्ट्रात विधानसभेवर निवडून जाण्याची संधी मिळाली. सार्वजनिक जीवनात आणि राजकारणात सातत्याने काम करत असताना लोकांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाच्या बळावर राज्यात मंत्री, मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याची संधी मिळाली. तसेच केंद्रात संरक्षणमंत्री आणि दहा वर्षे कृषीमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारीही मला मिळाली. या सर्व जबाबदाऱ्या पार पाडताना महाराष्ट्रासाठी तसेच देशासाठी सकारात्मक काम करता आले, यामागे जनतेचा विश्वास हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ राहिले आहे. महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे.'
'महाराष्ट्राने मला दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच माझ्या आयुष्याच्या ऊर्जेचे खरे स्रोत आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी आयुष्यभर मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ही सेवा प्रामाणिकपणे करत राहण्याचा माझा प्रयत्न असेल. सध्या डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यामुळे प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे शक्य नसल्याने या पत्रकाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवत आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे प्रेम, पाठिंबा आणि विश्वास हेच माझ्यासाठी कायम प्रेरणादायी राहतील,' अशी भावनिक साद शरद पवारांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे घातली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.