एक एप्रिलपासून फास्टटॅग वार्षिक टोल पासच्या दरात वाढ
मुंबई : खरा पंचनामा
राष्ट्रीय महामार्गावर वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. 1 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्गावरील FASTag वार्षिक टोल पासच्या दरात 75 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
त्यामुळे नियमितपणे महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी आता आधीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) 2026-27 या आर्थिक वर्षासाठी नवीन दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना वाहनचलकांना टोल भरावा लागतो. मात्र जे वाहनधारक दररोज किंवा वारंवार या मार्गावरून प्रवास करतात त्यांच्यासाठी वार्षिक टोल पासची सुविधा उपलब्ध आहे. या पासमुळे प्रत्येक वेळी टोल नाक्यावर पैसे भरण्याची गरज भासत नाही.
मात्र आता या वार्षिक टोल पासच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निर्णयानुसार, 1 एप्रिल 2026 पासून वार्षिक टोल पासची किंमत 3000 रुपायांवरून 3075 रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच वाहनचलकांना यासाठी 75 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. हा वार्षिक पास केवळ खाजगी म्हणजेच गैर-व्यावसायिक (खाजगी) वाहनांसाठी लागू आहे. व्यावसायिक वाहनांना ही सुविधा लागू होत नाही. तसेच वाहनात सक्रिय FASTag असणे आवश्यक आहे.
वार्षिक टोल पासची वैधता एक वर्ष किंवा 200 टोल क्रॉसिंगपर्यन्त असते. म्हणजेच एखाद्या वाहनाने एका वर्षात 200 वेळा टोल प्लाझा ओलांडला, तर त्या क्षणापासून पासची वैधता संपते, जरी एक वर्ष पूर्ण झाले नसले तरीही. त्यामुळे नियमितपणे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी हा पास फायदेशीर ठरतो.
सरकारकडून दरवर्षी टोल दारांचा आढावा घेतला जातो. त्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून यावेळी वार्षिक टोल पासच्या किमतीत किरकोळ वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व टोल प्लाझा आणि संबंधित अधिकाऱ्यांना 1 एप्रिलपासून नवीन दर लागू करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी वार्षिक टोल पास हा अजूनही सोयीचा पर्याय मानला जातो. कारण यामुळे प्रत्येक टोल नाक्यावर थांबून वेगळे पैसे भरण्याचा त्रास कमी होतो.
वाहनचालकांना वार्षिक टोल पास घेण्यासाठी त्यांच्या वाहनामध्ये सक्रिय FASTag असणे आवश्यक आहे. वाहन मालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अधिकृत वेबसाइटवर किंवा FASTag सेवा देणाऱ्या बँक किंवा मोबाइल अॅपवर लॉग इन करून या पाससाठी अर्ज करू शकतात. निर्धारित शुल्क भरल्यानंतर हा पास वाहनांच्या FASTag सोबत लिंक केला जातो. त्यानंतर टोल नाक्यावर वेगळे पैसे भरण्याची गरज भासत नाही. आणि वाहनचालक सहजपणे प्रवास करू शकतात.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.