Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कापूरहोळमधून व्यापाऱ्याच्या मुलाचे भरदिवसा अपहरणजेजुरी पोलिसांकडून मुलाची सुटका; दोघांना अटक, इतर दोघे फरार

कापूरहोळमधून व्यापाऱ्याच्या मुलाचे भरदिवसा अपहरण
जेजुरी पोलिसांकडून मुलाची सुटका; दोघांना अटक, इतर दोघे फरार

पुणे : खरा पंचनामा 

पुणे जिल्ह्यातील कापूरहोळ परिसर मंगळवारी, दि. ३ रोजी दुपारी अक्षरशः थरारून गेला. एका नामांकित व्यापाऱ्याच्या १८ वर्षीय मुलाचे भरदिवसा अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.

घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाल. मात्र, जेजुरी पोलीस स्टेशन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे काही तासांतच युवकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. तसेच चारपैकी दोन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

कापुरहोळ येथील युवकाचे अपहरण करणाऱ्या आरोपींना ऊसातून बाहेर पडल्यावर मांडकीच्या डोंगरांमध्ये पकडण्यात यश आले आहे. अक्षय लक्ष्मण इंगुळकर, अक्षय दत्तात्रय भालेराव (दोघे राहणार मांजरी, हडपसर) यांना ताब्यात घेतले आहे. इतर फरार आरोपी पंकज वाल्हेकर, गणेश धाडवे (राहणार कामथडी) यांचा शोध घेतला जात असल्याची माहिती जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी दिली. या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी कापूरहोळ येथून एका काळ्या (XUV700) एम एच १२ एक्स इ ५३५३ या कारमधून युवकाला जबरदस्तीने घेऊन जाण्यात आले.

हा प्रकार अचानक घडल्याने गावात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली, तर ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारेही मदतीचा संदेश देण्यात आला. घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी नीरा पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने जेऊर नीरा मार्गावर तात्काळ नाकाबंदी उभारली. नीरा औट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक रविराज कोकरे हरिश्चंद्र करे, प्रसाद कोळेकर यांनी तातडीने कारवाई करत अपहरण करण्याचा मार्ग बंद केला.

संशयित वाहनाचा शोध सुरू असतानाच जेऊरकडून पिसुर्टीकडे जाणारी एक संशयित कार पोलिसांच्या नजरेस पडली. पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न करताच चालकाने वेग वाढवला. मात्र, अरुंद रस्ता आणि घाईगडबडीत कार उसाच्या शेतात जाऊन कार अडकली. आणि परिस्थितीने नाट्यमय वळण घेतले. अपहरणकर्त्यांनी उसाच्या पिकाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला; पण पोलिसांनी तत्परतेने कारमधून युवकाला बाहेर काढत त्याची सुरक्षित सुटका केली. यानंतर जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे आणि त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर युवकाला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तो सुखरूप असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.