Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीवर फसवणुकीसह अॅट्रासिटीचा गुन्हा

एकनाथ खडसे आणि त्यांच्या मुलीवर फसवणुकीसह अॅट्रासिटीचा गुन्हा

जळगाव : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी शारदा चौधरी यांच्यावर जिल्ह्यातील बोदवड पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

बाप-लेकीने भुसावळ तालुक्यात प्रस्तावित साखर कारखान्यासाठी खरेदी केलेल्या जमिनीच्या प्रकरणात गैरप्रकार करुन फसवणूक केल्याची तक्रार एका मागासवर्गीय महिलेने केल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

भुसावळ तालुक्यातील मानपूर शिवारात २००२ मध्ये सहकारी साखर कारखाना उभारण्याच्या नावाखाली काही शेतजमिनींची खरेदी करण्यात आली होती. या व्यवहारातील गट क्रमांक १२२ ही महार वतनाची शेतजमीन मानपूर येथील चमेलाबाई तुकाराम तायडे आणि त्यांच्या वारसांच्या मालकीची होती. जमीन खरेदीच्या वेळी तायडे कुटुंबाला योग्य मोबदला देण्याचे तसेच प्रस्तावित तापी-पुर्णा सहकारी साखर कारखान्यात रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. याच अनुषंगाने तायडे कुटुंबाला एकनाथ खडसे यांच्याकडून ५१ हजार रुपये आगाऊ देखील मिळाले होते. त्यानंतर तायडे कुटुंबातील सदस्यांचे अंगठे घेऊन बोदवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जमिनीचा व्यवहारही पूर्ण करण्यात आला होता. मात्र, उर्वरित रक्कम मिळावी, यासाठी तायडे कुटुंबाने वारंवार पाठपुरावा करूनही त्यांना पूर्ण मोबदला देण्यात आला नाही.

दुसरीकडे, अनेक वर्षे उलटूनही संबंधित जागेवर सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला नाही. दरम्यान, २०२५ मध्ये तायडे कुटुंबाने या प्रकरणाची चौकशी केली असता, सदर जमीन शारदा एकनाथ खडसे यांच्या नावावर नोंद झाल्याचे समोर आले. या प्रकारामुळे धक्कादायक स्थिती निर्माण झाली. यानंतर तायडे कुटुंबाने रिपाइं (आठवले) गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल अडकमोल यांच्याकडे मदत मागितली. अडकमोल यांनी प्राथमिक पडताळणी केली असता जमीन शारदा खडसे यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर रिपाइंच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली.

दरम्यान, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी मूळ खरेदी खताची प्रत तपासली असता धक्कादायक बाब समोर आली. या दस्तऐवजात खाडाखोड करून खरेदीदार म्हणून नमूद असलेल्या "तापी-पुर्णा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज" या नावाच्या जागी "शारदा एकनाथ खडसे" असे लिहिल्याचे आढळले. तसेच खरेदीखताच्या पान क्रमांक १३ वरही अशाच प्रकारे बदल करून शारदा खडसे यांचे नाव समाविष्ट करण्यात आल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे संशय अधिकच बळावल्याने तायडे कुटुंबाने ९ मार्च रोजी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले. यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई म्हणून चमेलाबाई तुकाराम तायडे यांनी बोदवड पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार नोंदवली. आणि पुढील कार्यवाहीला गती मिळाली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.