'पटेल-तटकरेंना राष्ट्रवादी पक्षाचा ताबा घ्यायचा होता'
थेट पत्र दाखवत रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मुंबई : खरा पंचनामा
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताबद्दल कर्नाटकात गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अजित पवारांच्या अपघातानंतर जवळपास दोन महिन्यांनी हा गुन्हा दाखल झाला आहे.
यानंतर आता रोहित पवार यांनी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. पटेल आणि तटकरे यांना पक्षावर ताबा हवा होता. सगळं आधीच ठरलं होतं का? असा सवाल रोहित पवारांनी विचारला. यावेळी त्यांनी पत्र देखील दाखवलं.
पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, "अजितदादांच्या मृत्यूनंतर १८ व्या दिवशी म्हणजे १६ फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगाला एक पत्र देण्यात आलं. त्यात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि ब्रीजमोहन श्रीवास्तव या तीन लोकांच्या सह्या आहेत. त्यांनी पक्षाचं संविधान बदललं. यात त्यांनी कार्याध्यक्ष यांना पक्षाचे सगळे अधिकार आहेत, असं सांगितलं. सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांना न सांगता हे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं. बाकी आमदारांनाही याची काही कल्पना दिली नाही."
"या पत्राद्वारे या तीन नेत्यांनी अजित पवारांकडे असलेले सगळे अधिकार प्रफुल्ल पटेल यांना दिले. हे सुनेत्राकाकींना कळलं असावं, म्हणून त्या राष्ट्रीय अध्यक्ष होताच त्यांनी निवडणूक आयोगाशी पत्रव्यवहार केला. अजितदादा जीवंत असताना त्यांच्या घराबाहेर काळी जादू केली जाते. कदाचित नाशिकचा भोंदूबाबा खरातकडून ही पूजा करण्याचा प्रयत्न झाला. अशी काळीजादू करण्यामागे पक्षावर नियंत्रण मिळवण्याचं कारण होतं का? त्यानंतर २८ तारखेला त्यांचा अपघात झाला की घातपात ? याचा शोध आम्ही घेत आहोत" असंही रोहित पवार म्हणाले.
"या अपघातानंतर पीयूष गोयल यांनी सांगितलं होतं की प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यानंतर त्यांनी आपण अनावधानाने हे विधान केलं असं सांगितलं, मात्र घटनाक्रम पाहिला तर असं दिसतंय की, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि इतर पक्षाचे काही मोठे नेते यांच्यात कदाचित या गोष्टी आधीच ठरल्या होत्या. त्यामुळे प्रफुल्ल पटेल, तटकरे अजित दागदांच्या अंत्यविधीला काय हेतू मनात घेऊन आले होते, २७जानेवारीला बैठकीला उशीर का झाला? याचाही तपास व्हायला हवा, अशी मागणी रोहित पवारांनी केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.