घरकाम करणाऱ्या महिलेची निघृण हत्या
संशयित अभिनेत्याला विशाखापट्टणममधून अटक
पालघर : खरा पंचनामा
मिरा रोड परिसरात एका विवाहित महिलेची चाकूने वार करून हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सिल्वर पार्क येथील चंद्रेश आर्केड इमारतीत ही घटना बुधवारी रात्री घडली. सुमन कांबळे (वय 37) असे मृत महिलेचे नाव असून त्या घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमन कांबळे या काही महिन्यांपासून संबंधित इमारतीतील एका फ्लॅटमध्ये काम करत होत्या. बुधवारी त्या नेहमीप्रमाणे कामासाठी गेल्या असताना त्यांच्या वर चाकूने हल्ला करण्यात आला. शेजाऱ्यांना त्या जखमी अवस्थेत आढळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी टीव्ही अभिनेता आशिष मेश्राम याच्यावर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. घटनेनंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी शोध घेऊन त्याला विशाखापट्टणम येथून अटक केली आहे. प्राथमिक तपासात आरोपीने महिलेवर लैंगिक मागणी केली होती आणि ती नाकारल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
घटनेच्या वेळी महिला घरात एकट्याच होत्या. त्यांच्या मान, छाती आणि पोटावर वार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीचा वावर संशयास्पद असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले असून हा गुन्हा पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सुमन कांबळे यांच्या पश्चात पती आणि 4 मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.