Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'लवकर या, लवकर जा'पाणावलेले डोळे, जड आवाजातील पहिल्याच भाषणात सुनेत्रा पवारांचे नोकरदार महिलांसाठी धोरण

'लवकर या, लवकर जा'
पाणावलेले डोळे, जड आवाजातील पहिल्याच भाषणात सुनेत्रा पवारांचे नोकरदार महिलांसाठी धोरण

मुंबई : खरा पंचनामा 

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री म्हणून आज विधानपरिषदेत आपले पहिले भाषण केले.

यावेळी त्यांनी महिला सक्षमीकरणाचा मुद्दा मांडला. हे भाषण संपवताना सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर झाले. सुनेत्रा पवार यांनी बहिणाबाई चौधरी यांच्या अजरामर ओळी विधानपरिषदेत ऐकवत असताना त्या कमालीच्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. या भाषणाच्या शेवटी त्यांचा आवाज जड झाला आणि डोळ्यांत अश्रू तरळले. ज्यामुळे सभागृहातील वातावरण काही काळ स्तब्ध झाले होते. त्यांच्या शेजारी बसलेल्या मंत्री अदिती तटकरेही यावेळी भावूक झाल्या होत्या.

सुनेत्रा पवार यांनी यावेळी राज्यातील महिलांच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या योजनांचा उल्लेख केला. तसेच महायुती सरकार महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

यंदाचे चालू वर्ष हे महिला वर्ष म्हणून साजरे केले जाणार असून, त्याअंतर्गत राज्यात विविध कल्याणकारी कार्यक्रम राबवल्या जाणार आहेत. नोकरी करणाऱ्या महिलांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा विचार करून 'लवकर या, लवकर जा' ही संकल्पना राबवली जाणार आहे.

तसेच मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्ऱ्या गरजा लक्षात घेऊन विशेष सवलती आणि सोयी पुरवण्यावर सरकारचा भर असेल. महिलांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला 'शक्ती कायदा' लवकरात लवकर संमत व्हावा, यासाठी शासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

या भाषणाच्या शेवटी, ग्रामीण संस्कृती आणि स्त्रियांच्या कष्टांचे प्रतीक असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओळींचा उल्लेख करताना सुनेत्रा पवार यांचा आवाज जड झाला. अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर ही कविता आपल्या सर्वांना माहिती आहे. पण त्याचा अर्थ खूप सखोल आहे. या ओळीत स्त्रियांच्या सहनशीलतेची कष्टायची सुर्जन शक्तीची ताकद दडलेली आहे, असे सुनेत्रा पवारांनी सांगितले.

आजची स्त्री अशाच जिद्दीने संकटांना सामोरी जात, स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाजाचा विकास घडवत आहे. याच विचारातून महिलांना सन्मान, संधी आणि सुरक्षितता घडवणारा समाज घडवण्याचा आपल्या संकल्प अधिक दृढ करुया, असे आवाहन करते आणि थांबते, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या. यावेळी त्या प्रचंड भावूक झाल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.