पुणेकरांच्या सुखकर प्रवासासाठी 'रिक्षामित्र फीडर' सेवा
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते प्रारंभ
पुणे : खरा पंचनामा
पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त लाभ घेता यावा आणि त्यांचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील नेहमीच आग्रही आहेत. याच संकल्पनेतून आज पुणे मेट्रोच्या सहकार्याने 'रिक्षामित्र फीडर' सेवेचा शुभारंभ पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
याप्रसंगी संबोधित करताना ना. पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शहरात मेट्रोचे जाळे विस्तारत आहोत. यापूर्वी कोथरुडमध्ये सुरू केलेली 'शटल बससेवा' आणि रेल्वे स्टेशनवरील 'प्रीपेड रिक्षा' उपक्रमाला पुणेकरांनी दिलेला प्रतिसाद पाहता, ही नवीन फीडर सेवा देखील नक्कीच यशस्वी होईल, असा ठाम विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले. पुणे मेट्रो आणि 'बघतोय रिक्षावाला' संघटनेच्या सहकार्याने सुरू झालेला हा उपक्रम शहराच्या वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय ठरेल, असेही त्यांनी म्हटले.
या प्रसंगी पुणे मेट्रोचे संचालक श्रावण हर्डीकर, अनिलकुमार कोकाटे, अग्रवाल, 'बघतोय रिक्षावाला' संघटनेचे डॉ. केशव क्षीरसागर यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, भाजपा पदाधिकारी आणि संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.