भट्टीसारखा तापून निघतोय महाराष्ट्र
5 जिल्ह्यांसाठी अलर्ट, पारा 40 च्या वर
मुंबई : खरा पंचनामा
मुंबईसह अनेक भागांमध्ये उष्णतेच्या तीव्र झळा बसायला सुरुवात झाली आहे. अंगाची लाहीलाही होत आहे. डोक्यावर ऊन इतकं प्रचंड वाढलंय की नको वाटतंय. विदर्भात अपेक्षेप्रमाणे उन्हाचा तडाखा वाढला, पाऱ्याने 43 अंशावर उसळी घेतली आहे.
काल अकोला जगातील चौथे हॉट शहर ठरलं होतं. अकोला 43.1 अंशावर तर नागपूर 41.4 अंशावर तर अमरावती 42.4, वर्धा 42 अंश, वाशीम 41.6, चंद्रपूर 41 अंशाची नोंद करण्यात आली आहे. या आठवड्यात उन्हाचे चटके अधिक तीव्र होणार असल्याचा नागपूर वेध शाळेचा अंदाज वर्तवला आहे.
11 ते 4 कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या आठवड्यात उन्हाचे चटके आणखी तीव्र होणार आहेत. पुढचे दोन आठवडे ऊन कडाक्याचं असून लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं आहे. मागच्या आठवड्यात तयार झालेलं पश्चिमी विक्षोभ आता पूर्णपणे निवळला आहे. पुढच्या सहा दिवसांपर्यंत तापमान 45 डिग्रीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
मागच्या २४ तासांत उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उन्हाच्या झळांनी नागरिक घामाघूम झाले आहेत. मालेगाव, जळगाव आणि सोलापूरमध्येही पारा ४१ अंशांच्या पुढे सरकला आहे. राज्यात सध्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांचा प्रभाव वाढला आहे. विदर्भातील अमरावती आणि अकोल्यात ४१ ते ४२ अंशांपर्यंत तापमान पोहोचले असून, ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि मालेगाव पट्ट्यातही ४१ अंशांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, मराठवाड्यातील सोलापूरमध्येही उन्हाचा कडाका ४१ अंशांपर्यंत पोहोचल्याने दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
येत्या १५-१६ एप्रिल दरम्यान उत्तर भारतात एक नवीन 'वेस्टर्न डिस्टरबेंस' धडकणार आहे. मात्र, दिलासादायक बाब अशी की, त्याचा महाराष्ट्रावर कोणताही थेट परिणाम होणार नाही. या बदलामुळे केवळ उत्तर भारतातील डोंगराळ भागात ढगाळ वातावरण किंवा हलकी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मात्र आकाश पूर्णपणे निरभ्र राहणार असून सूर्याचे ऊन थेट जमिनीवर पडणार आहे. परिणामी, तापमानात आणखी वाढ होण्याचे संकेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.