Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सुनेत्रा पवारांविरोधात १९ उमेदवार मैदानात

सुनेत्रा पवारांविरोधात १९ उमेदवार मैदानात

बारामती : खरा पंचनामा 

राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने आता वेगळेच वळण घेतले आहे.

ही निवडणूक 'बिनविरोध' करण्यासाठी सत्ताधारी भाजपने सुरुवातीला प्रयत्न केले असले, तरी आता प्रत्यक्ष मैदानात मात्र सुनेत्रा पवार यांच्यासमोर अपक्ष आणि इतर पक्षांच्या उमेदवारांचा मोठा फौजफाटा उभा राहताना दिसत आहे. अधिकृत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असतानाच आतापर्यंत १९ जणांनी आपले नामांकन दाखल केले आहेत.

ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही या निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी अद्याप आपली राजकीय भूमिका (अपक्ष की पक्षीय) स्पष्ट केली नसली, तरी त्यांच्या उमेदवारीमुळे मतांच्या गणितात मोठी उलथापालथ होऊ शकते. महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक असलेल्या काँग्रेसकडूनही उमेदवार दिला जाण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास ही लढत तिरंगी किंवा चौरंगी स्वरूप धारण करेल. सुनेत्रा पवार ६ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज भरतील.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (मीडिया सर्टीफीकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी) गठित करण्यात आली आहे. बारामती विधानसभा पोट निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण या समितीकडून करुन घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच समितीचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे. उमेदवारांमार्फत प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक, समाज माध्यमे (सोशल मीडिया) तसेच फिरत्या एलईडी व्हॅन, ऑटो रिक्षा आदी बाह्यमाध्यमांवरून देण्यात येणाऱ्या श्राव्य (ऑडिओ), दृकश्राव्य (ऑडिओ-व्हीज्युअल) जाहिरांतीचे पूर्व प्रमाणीकरण या समितीमार्फत केले जाते. तर मुद्रीत माध्यमात (प्रिंट मीडिया) मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रकाशित करावयाच्या जाहिराती समितीकडून पूर्व प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे. माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समितीचे कामकाज जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून रुग्णालयासमोर, पुणे-४११००१ येथून चालणार असून दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२१३०७ असा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.