मुदत द्यायची की नाही याचा उद्या निर्णय घेऊ : परिवहन मंत्री सरनाईक
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादावर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. मंत्रालयातील परिवहन विभागाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली.
मराठी भाषा येत नसल्यास रिक्षाचालकांचे परवाने किंवा लायसन्स रद्द केले जातील, अशी चर्चा सर्वत्र सुरू होती. मात्र, परिवहन विभागाच्या बैठकीत यावर स्पष्टता देण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणि आवश्यक तयारी करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आला आहे. म्हणजेच, १५ ऑगस्टपर्यंत कोणत्याही प्रकारची कठोर कारवाई केली जाणार नाही. हा निर्णय रिक्षाचालकांच्या संघटनांनी केलेल्या मागणीचा आणि संपाच्या इशाऱ्याचा विचार करून घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यांनी याबाबतचा निर्णय उद्या घेण्यात येईल असे स्पष्ट सांगितले आहे.
मराठी शिकणारच नाही असं चालणार नाही. मुजोरी चालणार नाही. मराठी शिकणार नाही. पण महाराष्ट्रात धंदा करणार हे चालणार नाही. तुम्हाला मराठी शिकावीच लागेल, असं सांगतानाच आम्हाला मराठी शिकण्यासाठी मुदत मागितली आहे. आम्ही मुदत द्यायची की नाही याचा उद्या निर्णय घेऊ. मुदत दिली तरी शिकलं पाहिजे. नाही तर बैठका घेऊन उपयोग नाही, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.
आज रिक्षाचालकांचे प्रतिनिधी आले होते. त्यांना माझी भूमिका पटली आहे. माझ्या भूमिकेशी ते सहमत आहे. शशांक राव स्वतः कर्नाटकात जातात तेव्हा कानडी भाषेतच बोलतात. त्यांचं त्यांच्या मातृभाषेवर प्रेम आहे हे चांगलं आहे. मी संजय निरुपम यांना म्हणालो, तुम्ही हिंदी सामनाचे संपादक होता. बाळासाहेब तुम्हाला मराठी सामनाचे संपादक करतील असं वाटलं म्हणून तुम्ही मराठी शिकला. तसं इतरांनीही शिकलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
आज आलेल्या प्रतिनिधींनी रिक्षा चालकांना मराठी शिकवण्याची तयारी दर्शवली आहे. कुणी सांगितलं हॉल बूक करून शिकवू, कुणी सांगितलं की कार्यालयात शिकवू. आम्हीही स्वयंसेवी संस्थांकडून त्यांना मार्गदर्शन देणार आहोत. मराठी शिकायला ते तयार आहेत, तर सरकार म्हणून आम्हीही त्यांना शिकवायला तयार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.