Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सहकाऱ्यांनाच विनयभंग व अॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकीपोलीस ठाण्यातील लेडी डीओविरोधात अधीक्षकांकडे तक्रार

सहकाऱ्यांनाच विनयभंग व अॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी
पोलीस ठाण्यातील लेडी डीओविरोधात अधीक्षकांकडे तक्रार 

पुणे : खरा पंचनामा 

सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाणारे पोलीस ठाणेच आता भीतीचे केंद्र बनत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस ठाण्यातील एका महिला 'ड्युटी ऑफिसर'वर (लेडी डीओ) स्वतःच्या सहकाऱ्यांनाच खोट्या गुन्ह्यांची धमकी देत मानसिक छळ केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या प्रकरणी संबंधित कर्मचाऱ्यांनी थेट जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्याने संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

"जे कर्मचारी दरमहा ठराविक रक्कम देतात, त्यांनाच सोयीस्कर ड्युटी दिली जाते, तर पैसे देण्यास नकार देणाऱ्यांना जाणीवपूर्वक रात्रपाळी, वायरलेस व सीसीटीएनएससारखी दुहेरी जबाबदारी देऊन त्रास दिला जातो," असा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर हजेरीतही पक्षपात होत असल्याचे समोर आले आहे. या सततच्या छळामुळे अनेक महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच बदलीसाठी अर्ज केल्याची माहितीही पुढे आली आहे. "वरिष्ठांकडे तक्रार केली तरी आधीच आमच्याविरोधात चुकीची माहिती पोहोचवली जाते," अशी खंत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

सदर महिला पोलीस शिपाई जून 2025 मध्ये यवत (ता. दौंड) येथून बदली होऊन उरुळी कांचन (ता. हवेली) पोलीस ठाण्यात रुजू झाल्या. रुजू झाल्यानंतर अवघ्या एका महिन्यातच राजकीय प्रभाव वापरून त्यांनी हजेरी अंमलदारसारखे महत्त्वाचे पद मिळवल्याची चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून त्या या पदाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या महिला कर्मचाऱ्यांचा पूर्वइतिहासही वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे. सासवड पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाली होती. तसेच यवत पोलीस ठाण्यात असताना देखील तक्रारी वाढल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी त्यांना अकार्यकारी पदावर ठेवण्याचे आदेश दिले होते. असे असतानाही उरुळी कांचन येथे महत्त्वाचे पद कसे मिळाले, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित महिला कर्मचारी स्थानिक असून उरुळी कांचन परिसरात दोन हॉटेल्सला पाठबळ देत असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी अवैध दारू विक्री सुरू असल्याचा आरोप होत असून, स्वतः पोलीस दलात असूनही बेकायदेशीर व्यवसायांना पाठबळ दिले जात असल्याने पोलीस प्रशासनाच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक लवकरच वार्षिक तपासणीसाठी येणार असल्याने या प्रकरणातील सर्व पुरावे सादर करून संपूर्ण प्रकार उघड करण्याची तयारी तक्रारदार कर्मचाऱ्यांनी सुरू केली आहे. परंतु सध्या उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील हा अंतर्गत वाद उग्र रूप धारण करत असून, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल या गंभीर आरोपांवर काय कारवाई करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नागरिकांमध्येही या घटनेमुळे अस्वस्थता निर्माण झाली असून, पोलीस यंत्रणेवरील विश्वासाला धक्का बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.