लाचेच्या रक्कमेच्या नोटा उंदराने खाल्ल्या!
चकित झालेल्या सुप्रीम कोर्टाकडून अधिकारी महिलेच्या शिक्षेला स्थगिती
नवी दिल्ली : खरा पंचनामा
वर्षानुवर्षे 'तारीख पे तारीख' सुरू राहिल्यामुळे अनेक खटल्यांतील पुरावे कमजोर होतात आणि त्याचा खटल्यावर विपरीत परिणाम होतो. बिहार राज्यातील अशाच एका प्रकरणाने सर्वोच्च न्यायालयाला चक्रावून टाकले.
लाच घेतल्याच्या आरोपाखाली बालविकास विभागातील महिला अधिकारी दोषी आढळली होती, उच्च न्यायालयाने तिला शिक्षाही सुनावली होती. मात्र, लाचेच्या रकमेच्या नोटा उंदराने खाल्ल्या, असा आश्चर्यचकित करणारा युक्तिवाद महिला अधिकाऱ्याच्या वकिलांनी केला आणि सर्वोच्च न्यायालयाने थेट लाचखोर अधिकारी महिलेच्या शिक्षेलाच स्थगिती दिली. हे प्रकरण न्यायालयीन वर्तुळात सध्या चर्चेचा विषय बनले आहे.
बिहारमधील बालविकास कार्यक्रम अधिकारी अरुणा कुमारी यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाला हे निर्णायक वळण लागले. कुमारी यांनी 10 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 च्या कलम 7 आणि 13 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. कनिष्ठ न्यायालयाने त्यांना लाचखोरीच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले होते. मात्र उच्च न्यायालयाने तो निकाल फिरवला आणि कुमारी यांना दोषी ठरवून वेगवेगळ्या कलमांन्वये चार वर्षे आणि तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती जे. बी. परडीवाला आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर झाली. जप्त केलेल्या नोटा उंदरांनी खाऊन नष्ट केल्याचे समजल्यावर आम्हाला धक्का बसला आहे. हे राज्याच्या महसुलाचे मोठे नुकसान आहे. वास्तविक हे स्पष्टीकरण पटण्यासारखे नाही, असे निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने सविस्तर सुनावणी नंतर घेण्याची तयारी दर्शवली. मात्र तोपर्यंत कुमारी यांची जामीनावर सुटका करीत त्यांचा शिक्षेला स्थगिती दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.