आता मराठी बोलता येत नसेल तर रिक्षा परवाना होणार थेट रद्द!
राज्य सरकारचा मोठा निर्णय
मीरा भाईंदर : खरा पंचनामा
मीरा भाईंदर परिसरात बोगस कागदपत्रांच्या आधारे रिक्षा आणि टॅक्सी परवाने मिळवल्याच्या तक्रारींची दखल घेत राज्य सरकार आता अॅक्शन मोडमध्ये आले आहे.
या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आणि परवान्यांची सखोल फेरतपासणी करण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे या तपासणी मोहिमेदरम्यान रिक्षाचालकांना मराठी भाषा येते का, याचीही कसून पडताळणी केली जाणार आहे. ज्या चालकांना मराठी बोलता येत नाही, त्यांचे परवाना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात कठोर निर्देश दिले असून 1 मे पर्यंत या प्रकरणाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी यासंदर्भात तक्रार केली होती की, काही परप्रांतीय आणि परदेशी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या मदतीने बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखले मिळवले आणि त्यातून रिक्षा परवाने लाटले आहेत. हा प्रकार शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक मानला जात आहे. त्यामुळे परिवहन विभागाने मागील 10 वर्षांत दिलेल्या सर्व रिक्षा परवान्यांची पुन्हा एकदा छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मीरा भाईंदर भागात महिनाभराचा विशेष कॅम्प आयोजित केला जाणार असून प्रत्येक कागदपत्राची बारकाईने तपासणी केली जाईल. या मोहिमेसाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त सरकारी कर्मचारी देखील तैनात करण्यात येणार आहेत.
मोटार परिवहन नियमांनुसार रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. याच नियमाचा आधार घेत आता प्रत्येक चालकाची तोंडी परीक्षा किंवा पडताळणी केली जाईल. केवळ चालकच नाही, तर ज्या अधिकाऱ्यांनी नियमांकडे दुर्लक्ष करून चुकीच्या पद्धतीने हे परवाने दिले आहेत, त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्याचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत. ऑनलाइन प्रक्रिया असतानाही बोगसगिरी कशी झाली, याचा शोध आता घेतला जात आहे. या मोहिमेमुळे रिक्षा आणि टॅक्सी व्यवसायातील अनधिकृत प्रकारांना लगाम बसेल आणि खऱ्या स्थानिक चालकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळात ही मोहीम अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.