वाळूच्या टिप्परनं महसूल अधिकाऱ्याला चिरडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक
भंडारा : खरा पंचनामा
वाळूच्या अवैध वाहतुकीवर कारवाई सुरू असताना टिप्पर चालकानं थेट महसूल विभागाच्या मंडळ अधिकाऱ्याच्या अल्टो गाडीला धडक देत त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केलाय. ही खळबळजनक घटना भंडाऱ्याच्या पहेला ते बोरगाव मार्गावर घडली आहे.
पवनी तालुक्यातील पहेला गावचे मंडळ अधिकारी पृथ्वीराज अहिर हे त्यांच्या अधिनस्त असलेल्या महसूल सेवकासोबत गोलेवाडी या गावाकडे कार्यालयीन कामाकरीता जात होते.
यावेळी त्यांना एका टिप्परमधून वाळूची ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचं लक्षात आलं. यावेळी त्यांनी टिप्परला थांबवलं आणि कारवाई सुरू करत असताना टिप्पर मालक दुचाकीनं तिथं आला, आणि त्यानं महसूल अधिकाऱ्याशी हुज्जत घालून टिप्पर पळवून नेला. टिप्पर पळून नेल्यानं मंडळ अधिकारी अहिर यांनी त्यांच्या वाहनानं टिप्परचा थरारक पाठलाग केला. यावेळी शासकीय कामात ढवळाढवळ करताना ओव्हरलोड टिप्परमधील वाळू रस्त्यावर ठिकठिकाणी उलटवून महसूल अधिकाऱ्याला अडथळा निर्माण केला.
महसूल अधिकारी पाठलाग करीत असल्याचे निदर्शनात आल्यानंतर वाळू माफियानं त्यांच्या अल्टो कारला जबर धडक देत जीवघेणा हल्ला केला. वाळू माफियाच्या प्राणघातक हल्ल्यानंतरही नं डगमगता महसूल अधिकारी अहिर यांनी टिप्परला पकडलं आणि घटनेची माहिती अड्याळ पोलिसांना देत तक्रार दाखल केली.
दरम्यान, अड्याळ पोलिसांनी या प्रकरणी टिप्पर मालक शुभम जिभकाटे (27) आणि चालक अनंता सावरबांधे (20) या दोघांविरोधात कलम वाळूची ओव्हरलोड वाहतूक करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, वाहनाला धडक देत शासकीय अधिकाऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणे यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.