'अपराधसिद्धीसाठी भक्कम पुरावे गोळा करा'
मुंबई : खरा पंचनामा
नाशिकमधील अशोक खरात प्रकरण, त्यामागोमागच मल्टीनॅशनल कंपनीमध्ये धर्मांतरणाचा प्रकार, लैंगिक शोषण प्रकरणासह मुंबईतील गोरेगाव नेस्कोतील ड्रग्ज प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी कटाक्ष टाकला. गृह विभागाच्या आढावा बैठकीदरम्यान फडणवीसांनी काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा केल्यानं आता राज्यात गुन्हेगारांची खैर नाही हेच स्पष्ट झालं आहे.
नाशिक धर्मांतर, खरात, परतवाडा, गोरेगाव ड्रग्ज या प्रकरणांचं गांभीर्य पाहता सुरुवातीपासूनच मुख्यमंत्र्यांनी त्यात लक्ष घातलं होतं. ज्यानंतर आता या प्रकरणी कारवाई आणि तपासाचा आढावा त्यांनी घेतल पोलिस विभागाला विविध सूचना दिल्या. आढावा बैठकीसाठी पोलीस महासंचालक, गृह अतिरिक्त मुख्य सचिव, SIT प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
नाशिकधील महिला अत्याचार आणि भविष्यवाणी सांगण्याच्या बहाण्यानं अनेकांचीच फसवणूक करणाऱ्या भोंदू 'अशोक खरात प्रकरणी पीडितांना संपूर्ण विश्वास द्या. या प्रकरणात कुणीही दोषी असो त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. कोर्टात ही केस मजबूत कशी होईल, यासाठी भक्कम पुरावे गोळा करा. तपासात अपराधसिद्धी हा महत्वाचा घटक असला पाहिजे', अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.
नाशिकमधीलच प्रतिष्ठित आयटी कंपनीमध्ये घडलेल्या धर्मांतराच्या मुद्द्यावरून असे प्रकार हे अजिबात खपवून घेऊ नका असं थेट वक्तव्य त्यांनी केलं. नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उजेडात आणल्याबद्दल अभिनंदन करत 'इतक्यावर न थांबता आता त्याचा तितकाच दमदार तपास झाला पाहिजे, शिवाय यात असणाऱ्या सर्व पॅटर्नचा तपास करा, कोणताही अँगल तपासातून सुटू नये' यासाठी ते आग्रही दिसून आले.
अमरावतीतील परतवाडा प्रकरणात पीडितांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वास दिला पाहिजे, ही गरज व्यक्त करत यासाठी संबधित समाजसेवकांची मदत घ्यावी असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी यंत्रणांना दिला. तर, मुंबईतील गोरेगाव नेस्को ड्रग्ज प्रकरणात ड्रग्जविरोधात मोठ्या प्रमाणात कारवाया करा. तरुणाईच्या भविष्याशी निगडित ही बाब आहे, त्यामुळे अशी प्रकरणे एकदम गांभीर्याने घ्या, अशी ठाम भूमिका मांडत त्यांनी यंत्रणांना सूचित केलं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.