स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत, कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून, त्यांना बदनाम करण्याची धमकी देवून खरातने केले पीडितांचे लैंगिक शोषण
SIT च्या पहिल्या पत्रकार परिषदेत आयपीएस तेजस्वी सातपुते यांची माहिती
नाशिक : खरा पंचनामा
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष पथकाने आज पहिली पत्रकार परिषद घेतली. एसआयटीच्या प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी तपासात आतापर्यंत काय-काय कारवाई करण्यात आली? याची माहिती दिली.
"अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि अहिल्यानगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकूण 12 गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये अशोक खरात आरोपी आहे. या 12 गुन्ह्यांपैकी 9 गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. 2 गुन्ह्यांचा पोलीस अहिल्यानगर पोलीस करत आहेत. एका गुन्ह्याचा तपास नाशिक शहर पोलीस करत आहेत. अशोक खरात विरुद्ध नसलेले पण या विषयाशी संबंधित असलेल्या दोन गुन्ह्यांच्यादेखील तपास एसआयटी करत आहे", अशी माहिती त्यांनी दिली.
"आमच्याकडे दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी 8 गुन्हे हे महिला लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत. उर्वरित 3 गुन्हे फसवणूक, अंधश्रद्धा विरोधी कायदा, सावकारी अधिनियम 2014 आणि इकोनॉमिक ऑफेन्सेसचे कलम दाखल आहेत. महिला लैंगिक अत्याचाराचे सर्व 8 गुन्हे आणि फसवणुकीचा एक गुन्हा तपासासाठी एसआयटीकडे आहे", असं सातपुते यांनी सांगितलं.
"आजपर्यंतच्या तपासादरम्यान 30 पेक्षा जास्त साक्षीदारांकडे आपण विचारपूस केली आहे. साक्षीदार आणि पीडितांकडे आपण जी विचारपूस केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता. त्यांना भीता दाखवत होता. खडे, चिंचोका, रुद्राक्ष, पूजा, विधी इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसे उकळत होता. महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवत होता. त्यांच्या कुटुंबियांच्या मृत्यूची भीती दाखवून, त्यांना बदनाम करण्याची धमकी देवून त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याचबरोबर ईशानेश्वर मंदिर परिसरात अंधारामध्ये हातचालाखीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं भासवून समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरवण्याचं काम करत होता, असं तपासात निष्पन्न होत आहे", अशी माहिती एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिली.
"महिला अत्याचाराच्या संदर्भात आठही गुन्ह्यांमध्ये पीडिता आणि त्यांचे कुटुंबिय अतिशय धाडसाने सामोरे आले आहेत. त्यांनी फिर्याद दाखल केली आहे त्यामुळेच आपण आरोपीवर कारवाई करु शकत आहोत. मी सर्वांना आवाहन करु इच्छिते की, या महिलांना लोक काय म्हणतील या भीतीने अन्याय सहन केला आहे. आता कुटुंबाला विश्वासात घेऊन गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावर त्यांचे व्हिडीओ न पसरवणे, आपल्या मोबाईल्समध्ये असे व्हिडीओ न बाळगणे हे आपल्या सर्वांचे नैतिक कर्तव्य आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे तसे आदेश आहेत. पीडितेची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खासगी बाबींची सार्वजनीक चर्चा न होणं हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचं धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणूनच न्याय संस्थेने वारंवार कारवाई केली आहे", असं सातपुते म्हणाल्या.
"अशा केसेसमध्ये पोलिसांच्या पत्रकार परिषदेतही मर्यादा निश्चित करण्यात आल्या आहेत. पीडितेच्या गोपनीयतेचा भंग ज्या समाजमाध्यमातून झाला आहे तिथून ती माहिती हटवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पीडिता किंवा कुटुंबियांची मुलाखती घेण्यास बंदी आहे. अंतिम निकाल येण्यापूर्वी आरोपीच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे आणि मीडिया ट्रायल, केवळ तर्कवितर्काच्या आधारित वार्तांकन टाळावेत, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत", असं आवाहन त्यांनी केलं.
"एसआयटीचे या प्रकरणात 40 ते 45 दिवसांत तपास पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. पीडितांना मनस्ताप होणार नाही याची समाज म्हणून काळजी घेऊयात. आपल्या माध्यमातून पदाधिकारी, अधिकारी यांना चौकशीसाठी बोलवणार आहेत का? किंवा अमूकला का बोलावलं नाही? अशा प्रकारच्या शंका आणि प्रश्न असू शकतात. अनेक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी मला वेळोवेळी मेसेज करुन विचारलं आहे", अशी माहिती त्यांनी दिली.
"मी सांगू इच्छिते की, आपल्याकडे फिर्यादी आणि साक्षीदार सांगतात त्या अनुषंगाने तपास होत असतो. तपासा दरम्यान पुरावे समोर येत असतात त्यानुसार पुढील तपास केला जातो. पुराव्याच्या आधारे कोण व्यक्ती सहआरोपी आहे का? ते पाहिलं जातं. त्या अनुषंगाने त्याची चौकशी केली जाते आणि कायदेशीर कारवाई केली जाते. या प्रकरणात इतर कोणी आरोपी आहे का? पुराव्यानिशी माहिती मिळाली तर निश्चित तपास केला जाईल. आमचा तपास अजूनही सुरु आहे. काही प्रश्नांचे उत्तरे राहिली असती तपास पुढे जाईल तशी माहिती दिली जाईल. आरोपी अशोक खरातची पोलीस कोठडी मिळावी यासाठी न्यायालयात विनंती करणार आहोत. अशोक खरातचे आर्थिक व्यवहार आणि संपत्तीबाबत ईडीने माहिती घेतली आहे. भविष्यातही ईडीला आमचे पूर्ण सहकार्य असणार आहे", अशी महत्त्वाची माहिती IPS तेजस्वी सातपुते यांनी दिली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.