Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आमदारांच्या सभागृहात दांड्या!उद्धव ठाकरेंची 4 वर्षात फक्त 42 दिवस हजेरी

आमदारांच्या सभागृहात दांड्या!
उद्धव ठाकरेंची 4 वर्षात फक्त 42 दिवस हजेरी

मुंबई : खरा पंचनामा 

महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीची एक अत्यंत महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. यामुळे लोकप्रतिनिधींच्या सभागृहातील गांभीर्याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. या आकडेवारीनुसार, विधान परिषदेच्या कामकाजात विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांच्या उपस्थितीत कमालीची तफावत दिसून येत आहे.

एकीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही बड्या नेत्यांची उपस्थिती अत्यंत निराशाजनक राहिली आहे, तर दुसरीकडे काही आमदारांनी ९० टक्क्यांहून अधिक ते अगदी १०० टक्के उपस्थिती राखत आदर्श कामगिरी केली आहे.

शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीतबद्दल धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. २०२० मध्ये विधान परिषदेत प्रवेश केलेल्या उद्धव ठाकरे यांनी गेल्या चार वर्षांत एकूण १३३ बैठकींपैकी केवळ ४२ बैठकींना हजेरी लावली आहे. त्यांची एकूण उपस्थिती अवघी ३१.५८ टक्के इतकी राहिली आहे.

उद्धव ठाकरे हे २०१९ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाले होते, मात्र या सुरुवातीच्या काळातील त्यांच्या उपस्थितीची अधिकृत नोंद उपलब्ध नाही. परंतु, २०२२ मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या उपस्थितीचा आलेख कमालीचा घसरला. राजीनाम्यानंतरच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी फक्त एकाच बैठकीला हजेरी लावली होती. तसेच, नुकत्याच पार पडलेल्या २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही १६ बैठकींपैकी ते केवळ ४ बैठकींना उपस्थित होते.

सभागृहाच्या कामकाजाकडे पाठ फिरवणाऱ्यांमध्ये केवळ उद्धव ठाकरेच नाहीत, तर इतरही काही बड्या नेत्यांचा समावेश आहे. यात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सलग तीन अधिवेशनांमध्ये एकदाही सभागृहात हजेरी लावलेली नाही. लोकप्रतिनिधी सलग तीन अधिवेशने पूर्णपणे गायब राहिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

एकीकडे ज्येष्ठ नेत्यांची अनास्था दिसत असताना, दुसरीकडे काही तरुण आणि अभ्यासू आमदारांनी मात्र उपस्थितीचा नवा आदर्श घालून दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी आणि काँग्रेसचे राजेश राठोड यांनी गेल्या सहा वर्षांतील १८ अधिवेशनांपैकी तब्बल १३ अधिवेशनांमध्ये १०० टक्के उपस्थिती नोंदवली आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांनीही १८ पैकी ११ अधिवेशनांत पूर्ण वेळ उपस्थित राहून आपली जबाबदारी पार पाडली आहे. याशिवाय सध्याच्या सदस्यांमध्ये मनीषा कायंदे, जगन्नाथ अभ्यंकर आणि सुधाकर आडबाले यांनीही अनेक अधिवेशनांत १०० टक्के उपस्थिती राखत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

दरम्यान विधान परिषदेतील सदस्यांच्या उपस्थितीच्या आकडेवारीमुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी पाठवलेले लोकप्रतिनिधी सभागृहात किती वेळ देतात, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.