Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

विधान परिषद निवडणूक बिनविरोध?दहा जागांसाठी दहा जणांचे अर्ज

विधान परिषद निवडणूक बिनविरोध?
दहा जागांसाठी दहा जणांचे अर्ज

मुंबई : खरा पंचनामा 

विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत ताणलेली उत्सुकता अखेर संपली असून महाविकास आघाडी आणि महायुती यांनी आपापल्या उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा करीत विधान परिषदेच्या नऊ नियमित जागा आणि एका पोटनिवडणुकीसाठी अशा सर्व दहा जागांसाठी दहाच अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. महायुतीने आपली मांडणी कायम ठेवत मित्रपक्षांना सोबत घेतले, तर महाविकास आघाडीत (मविआ) निर्माण झालेला तणाव शेवटच्या क्षणी चर्चेतून निवळल्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरळीत झाली.

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ आणि प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठीची पोटनिवडणूक अशा दहा जागांसाठी सर्व पक्षांकडून दहाच अर्ज आले. या निवडणुकीसाठी तीन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला असला तरी त्यांना दहा आमदारांची सूचक म्हणून सही नसल्याने या संबंधित अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद ठरण्याची शक्यता विधानभवनातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

भाजपकडून सहा, शिवसेनेकडून दोन, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक आणि महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या एका उमेदवाराचा अर्ज दाखल झाला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिवंगत नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता मराठा उमेदवाराला संधी दिली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र पक्षाने झिशान सिद्दीकी यांना संधी दिल्याने पक्षातील एकजण नाराज असल्याची चर्चा आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा राजकीय धक्का देत 'प्रहार' संघटनेचे नेते बच्चू कडू यांना पक्षात प्रवेश देऊन थेट उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेत विधानपरिषदेची इच्छुकांची संख्या मोठी असल्याने निर्णय घेणे अत्यंत कौशल्याचे काम होते. मात्र या परिस्थितीत शिंदे यांनी धाडसी निर्णय घेत बच्चू कडू यांना उमेदवारी दिली आहे. त्याचबरोबर डॉ. नीलम गोऱ्ह यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर संधी देण्यात अली आहे.

पक्षनिहाय उमेदवार : 
भाजप: सुनील कर्जतकर, प्रमोद जठार, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव
शिवसेनाः डॉ. नीलम गोऱ्ह, बच्चू कडू
राष्ट्रवादी काँग्रेसः झिशान सिद्दीकी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे): अंबादास दानवे

महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच अखेर सुटला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचे नाव पुढे केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजी होती. उद्धव ठाकरे यांना उमेदवारी दिली तरच आमचा पाठिंबा राहील अशी भूमिका काँग्रेसने घेतली होती. दानवे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर वेगळी चूल मांडत स्वतःचा उमेदवार देण्याची घोषणा पक्षाने केली होती. मात्र, ठाकरेंच्या पक्षाचे नेते अनिल परब, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर यांनी काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ, सतेज पाटील आणि विजय वडेट्टीवार आदी नेत्यांशी चर्चा केल्यानंतर तणाव निवळला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.