फसवणूक करणाऱ्या टोळीचा एलसीबीकडून पर्दाफाश; पोलीस अंमलदारही अटकेत !
जळगाव : खरा पंचनामा
एकीकडे फसवणुकीच्या घटना सातत्यानं समोर येत असतानाच, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) एका मोठ्या फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर ५ लाख रुपयांच्या परताव्याचे आमिष दाखवून तब्बल ५ लाख २० हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या तिघांच्या एलसीबीने मुसक्या आवळल्या आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या टोळीत एका पोलीस अंमलदाराचाही सहभाग असल्याचे उघड झाले आहे.
चोपडा तालुक्यातील धानोरा येथील रहिवासी जगदीश शंकर व्यास यांना संशयित आरोपींनी १ लाखाच्या बदल्यात ५ लाख रुपये देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून व्यास यांनी आपला मुलगा पंकज याला ५ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम घेऊन जळगावमधील हॉटेल कमल पॅराडाईज येथे बोलावले. पंकज हॉटेलजवळ पोहोचला असताना आरोपींनी त्याला आपल्या गाडीत बसवून, 'इथे पोलीस चेकिंग सुरू आहे' असे सांगून भुसावळच्या दिशेने घेऊन गेले. वाटेतच आरोपींनी पंकजकडून ५ लाख २० हजार रुपयांची रोख रक्कम हिसकावून घेऊन त्याला सोडून पसार झाले. या प्रकरणी जळगावच्या शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. यानुसार एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना, आरोपी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाड येथील 'एकता हॉटेल' जवळ लपून बसल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने तात्काळ तेथे जाऊन सापळा तिघांना अटक केली.
धक्कादायक म्हणजे तिघांमध्ये वाशिम पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस अंमलदारचा समावेश होता. भागवत दत्ताराव कष्टे (वय ४०) असं पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्यासोबत प्रकाश लक्ष्मण शिंदे (वय ४० वर्ष, रा.मु.पो. पेनबोरी, जि. वाशिम) व स्वप्नील दिलीप दळवी (वय ३३ वर्ष रा. टिळक चौक, शिंपी वेटाळ, वाशिम) या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासासाठी शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) साजिद मन्सुरी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या कारवाईमुळे पोलीस दलात मात्र मोठी खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.