Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एआरटीओ राजेंद्र केसकर निलंबितलाच प्रकरणात झाली होती कारवाई

एआरटीओ राजेंद्र केसकर निलंबित
लाच प्रकरणात झाली होती कारवाई

गोंदिया : खरा पंचनामा 

येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (एआरटीओ) राजेंद्र सदाशिव केसकर यांना भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांप्रकरणी महाराष्ट्र शासनाने तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. या संदर्भातील अधिकृत शासन आदेश गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांच्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. केसकर यांनी खाजगी इसमाच्या मार्फत तक्रारदाराकडून ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले होते. दरम्यान, त्यांच्या विरोधात ५ डिसेंबर २०२५ रोजी गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यांच्या पुणे येथील घराच्या झडतीत कोट्यवधीची अपसंपदा मिळाली होती.

सध्या या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ अंतर्गत केसकर यांना निलंबित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासन आदेशानुसार निलंबन काळात त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता व महागाई भत्ता देण्यात येणार आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालय निश्चित करण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असेही आदेशात नमूद आहे. हा आदेश २९ एप्रिल २०२६ पासून लागू करण्यात आला असून शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिवहन विभागात खळबळ उडाली असून, भ्रष्टाचाराविरुद्ध राज्य सरकारची कठोर भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.