भोंदू अशोक खरात प्रकरण : ४९ दिवसांची कोठडी आणि १०५ साक्षीदार; २ गुन्ह्यांत चार्जशीट दाखल
नाशिक : खरा पंचनामा
संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवणाऱ्या अशोक खरात प्रकरणात आता विशेष तपास पथकाने (एसआयटी) तपासाचा वेग प्रचंड वाढवला आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांत खरात एकूण ४९ दिवस पोलीस कोठडीत होता.
आतापर्यंत १०५ हून अधिक साक्षीदारांची चौकशी करण्यात आली. खरात विरोधातील पुराव्यांची साखळी भक्कम करीत लैंगिक अत्याचाराच्या दोन गुन्ह्यांत न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल करण्यात आले आहे.
महिलांचे लैंगिक शोषण, खंडणी, जमीन बळकावणे, फसवणूक आदी प्रकरणी अशोक खरातवर नाशिक आणि नगर जिल्ह्यात एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. यातील ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत असून त्यापैकी आठ गुन्हे हे महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे आहेत. फसवणुकीचा एक, खरातने साक्षीदाराविरुद्ध खोटा खंडणीचा दाखल केलेला एक तसेच तक्रारदारावर दबाव टाकून साक्षीदाराविरुद्ध दाखल केलेला एक असे दोन गुन्हे आहेत.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. खरात हा लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असे. स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून, कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची भीती दाखवून आणि हातचलाखीने खडे, चिंचुके, रुद्राक्ष यांसारख्या माध्यमांतून तो लोकांकडून पैसे उकळत होता. इतकेच नव्हे, तर महिलांना बदनामीची धमकी देऊन त्यांचे लैंगिक शोषण केल्याचेही निष्पन्न झाले आहे. ईशानेश्वर मंदिर परिसरात अंधश्रद्धा पसरवण्याचे त्याचे कारनामे आता उघड झाले आहेत. या बाबत खरात विरोधात मौखिक, भौतिक, दस्तावेजी, परिस्थितीजन्य, इलेक्ट्रॉनिक अशा पुराव्यांच्या आधारे दोषारोपपत्र दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे एसआयटीने म्हटले आहे.
महिलांशी संबंधित गुन्ह्यात बीएनएसएस कलम ९३ नुसार गुन्हा दाखल झाल्यापासून ६० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक असते. खरातविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा पहिला गुन्हा १७ मार्च २०२६ रोजी दाखल झाला होता. त्यानंतर आठवडाभरात इतर सात गुन्हे दाखल झाले. लैंगिक शोषणाच्या दोन गुन्ह्यांत एसआयटीने दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. उर्वरित गुन्ह्यांत येत्या काही दिवसांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाईल. प्राप्त पुराव्यांच्या आधारे न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्रही सादर केले जाईल, असे एसआयटीने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे पीडित महिलांचे समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आलेल्या आक्षेपार्ह चित्रफिती. एसआयटीच्या सायबर टीमने महाराष्ट्र सायबरच्या मदतीने या चित्रफितींच्या तब्बल १३,१७५ लिंक्स इंटरनेटवरून हटवल्या आहेत. तसेच, सातत्याने अशा पोस्ट टाकणारे ४५१ सोशल मीडिया अकाउंट्स कायमस्वरूपी बंद केली. चित्रफिती प्रसारित केल्याप्रकरणी आतापर्यंत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.