काँग्रेस नेत्याला अटक करण्यासाठी 'फिल्डींग' लावलेल्या मुख्यमंत्र्यांना धक्का
नवी दिल्ली : खरा पंचनामा
आसाम विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली होती. त्यातच काँग्रेस नेते पवन खेडा यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीविरोधात धक्कादायक आरोप करत खळबळ उडवून दिली होती.
त्यावरून खेडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तेव्हापासून खेडा हे गायब आहेत. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने खेडा यांना दिलासा दिला आहे.
पवन खेडा यांना अटक करण्यासाठी आसाम पोलिसांनी त्यांच्या दिल्लीतील घरावर धाड टाकली होती. पण तिथे खेडा सापडले नाही. त्यानंतर काही तासांत खेडा यांनी तेलंगणा हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला. तिथे जामीन मंजूर झाला. पण पोलिसांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने जामिनाला स्थगिती देत गुवाहाटी हायकोर्टात जाण्यास सांगितले. या कोर्टाने जामीन फेटाळला.
खेडा यांनी पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर गुरूवारी सुनावणी झाली. कोर्टाने शुक्रवारी सकाळी निकाल देत खेडा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. खेडा यांच्यासाठी हा मोठा दिलासा असून त्यांच्या अटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या हिमंता बिस्वा सरमा यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
पवन खेडा यांनी पत्रकार परिषद घेत सरमा यांच्या पत्नी रिंगी भूईया यांच्याकडे तीन पासपोर्ट असल्याचा तसेच विदेशात संपती असल्याचा आरोप केला होता. ऐन निवडणुकीत या आरोपांनी खळबळ उडवून दिली. सरमा पती-पत्नीने हे आरोप फेटाळून लावत पोलिसांत तक्रार केली. रिंकी भूईया यांच्या तक्रारीनुसार खेडा यांच्याविरोधात मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच आसाम पोलिसांकडून खेडा यांना अटक करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. पण खेडा त्यांच्या हाती लागले नाही. आज सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन देताना म्हटले की, कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तिगत स्वातंत्र्य सहजपणे धोक्यात टाकले जाऊ शकत नाही.
दोन्ही बाजूने (खेडा आणि सरमा पती-पत्नी) आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत, याची आम्हाला जाणीव आहे पण कोणाच्याही स्वातंत्र्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत कोर्टाने खेडा यांना जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मंजूर करताना कोर्टाने खेडा यांना चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोर्टाच्या परवानगीशिवाय परदेशातही जाता येमार नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.