निदा खानला कुणाच्या सांगण्यावरून घर दिलं?
एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांवर प्रश्नांची सरबत्ती
नाशिक : खरा पंचनामा
राज्यभरात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील 'कॉर्पोरेट जिहाद', धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी महिला निदा खान हिला बेकायदेशीरपणे आश्रय देणारे छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचे (MIM) नगरसेवक मतीन पटेल अखेर आज नाशिक पोलिसांसमोर हजर झाले आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयात विशेष तपास पथकाकडून गेल्या दोन तासांपासून मतीन पटेल यांची कसून चौकशी सुरू आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान नाशिकमधून फरार झाली होती. या काळात मतीन पटेल यांनी तिला छत्रपती संभाजीनगर येथे स्वतःच्या घरात लपवून ठेवत आश्रय दिला होता. याप्रकरणी नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मतीन पटेलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक पोलिसांचे पथक त्याच्या शोधार्थ संभाजीनगरमध्ये गेले होते, मात्र ते मिळून आले नव्हते.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात नाशिक रोड न्यायालयात रीतसर दोषारोपपत्र दाखल केले. दोषारोपपत्र दाखल होताच गुन्हे शाखेने मतीन पटेल यांना थेट कायदेशीर नोटीस बजावली. कोणतीही पळवाट न उरल्याने अखेर मतीन पटेलने नरमाईची भूमिका घेत आज, 25 मे रोजी आपल्या वकिलांसह नाशिक पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
सध्या एसआयटी (SIT) च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मतीन पटेल यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली जात आहे. निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या घरात राहत होती, ते घर नेमके कोणाच्या सांगण्यावरून मतीनने उपलब्ध करून दिले? याचा शोध पोलीस घेत आहेत. यासोबतच, ज्या घरात निदा खानला लपवण्यात आले होते, त्या मूळ घरमालकाचा देखील एसआयटी जबाब नोंदवून घेणार आहे. या चौकशीनंतर मतीन पटेल यांना अटक होणार की त्यांना सोडले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी संभाजीनगर महानगरपालिकेने मतीन यांच्या घर आणि कार्यालयावरही कारवाई केली होती.
दुसरीकडे, या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांचे धक्कादायक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. मुख्य संशयित आरोपी दानिश शेख याने पीडितेकडून 2 लाख रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचा खुलासा झाला असून, एसआयटीने त्याचे बँक खाते सील केले आहे. या गुन्ह्यात फसवणुकीचे सबळ पुरावे जोडण्यात आले असून, लवकरच पुरवणी दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.