'सायंतारे' कवितासंग्रहासाठी कवी प्रकाश कुलकर्णी यांचा गौरव
२४ मे रोजी कोल्हापुरात पुरस्कार वितरण
पूजा फडके
मिरज/कोल्हापूर : खरा पंचनामा
साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी दिला जाणारा दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा यंदाचा विशेष पुरस्कार जाहीर झाला असून, मिरजचे सुप्रसिद्ध कवी श्री. प्रकाश हरी कुलकर्णी यांनी यावर आपले नाव कोरले आहे. त्यांच्या 'सायंतारे' या बाल कवितासंग्रहासाठी ही निवड करण्यात आली आहे.
दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून दर्जेदार साहित्याचा गौरव करत आहे. यंदाचा विशेष पुरस्कार एका बाल कवितासंग्रहाला जाहीर झाल्यामुळे बालसाहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. प्रकाश हरी कुलकर्णी यांच्या कवितांनी मुलांच्या भावविश्वाला स्पर्श करत साहित्यात मोलाची भर घातली आहे, असे मत निवड समितीकडून व्यक्त होत आहे.
हा पुरस्कार वितरण समारंभ रविवार, दिनांक २४ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता पार पडणार आहे. कोल्हापूर येथील शिवाजी उद्यमनगरमधील 'शेठ रामभाई सामाणी स्मृती हॉल' येथे हा सोहळा संपन्न होईल. यावेळी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मिरज आणि सांगली जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात या पुरस्कारामुळे मानाचा तुरा रोवला गेला असून, विविध स्तरांतून कवी प्रकाश कुलकर्णी यांचे अभिनंदन केले जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.