राज्यात उदंड झाल्या 'व्हिडीओ कॉन्फरन्स'!
जिल्हा घटक प्रमुखांना फिल्डवर काम करण्यात येताहेत अडचणी
मुंबई : खरा पंचनामा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन वाचवण्याच्या आवाहनानंतर राज्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांच्या बैठका सुरु झाल्या आहेत. पण पंतप्रधान मोदी यांनी आवाहन करण्यापूर्वीच राज्याची धुरा सांभाळणाऱ्या प्रमुख अधिकाऱ्यांनी 'व्हिसी'चा धडाका लावला आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावर घटक प्रमुख पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून काम करण्यासाठी वेळच मिळत नसल्याचे चित्र आहे. याचा सर्वाधिक फटका गृह आणि महसूल विभागाला बसत आहे. त्यामुळे राज्यात 'उदंड झाल्या व्हिडीओ कॉन्फरन्स' असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक काही दिवसांपूर्वीच बदलले आहेत. शिवाय अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. बदलून आलेले अधिकारी त्यांच्या पद्धतीने कामकाज करत आहेत. त्यांना काही वेगळ्या योजना, उपक्रम राबवायचे आहेत. त्यासाठी अति वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 'व्हिसी'चा धडाकाच लावला आहे.
बरं या 'व्हिसी'ना वेळ काळ काहीच नसल्याची चर्चा आहे. कधी सकाळी नऊ तर कधी अकरा, कधी बारा, एक, दोन तर कधी अचानक दुपारी चार, पाच आणि सायंकाळी सहा, सात वाजता व्हिसी घेतली जाते. या 'व्हिसी'सोबत कार्यालयीन कामकाजचा निपटारा करावा लागत आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावर असलेल्या अधिकाऱ्यांना फिल्डवर काम करताना अडचणी येत आहेत.
विशेष म्हणजे राज्यातील अति वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले का? तसेच त्याची अंमलबजावणी झाली की नाही याची माहिती घेण्यासाठी अति वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील अपर दर्जाचे अधिकारीही वारंवार 'व्हिसी' घेतात. त्यामुळे उदंड झालेल्या या 'व्हिसी'ना आता आवरा असेच म्हणायची वेळ जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांवर आली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.