Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पार्थ पवार अचानक 'वर्षा'वर!फडणवीसांसोबत ४५ मिनिटं खलबतं

पार्थ पवार अचानक 'वर्षा'वर!
फडणवीसांसोबत ४५ मिनिटं खलबतं

मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) मोठ्या प्रमाणात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं समोर येत आहे. निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेल्या नव्या कार्यकारणीच्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा उल्लेख नसल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारं काही अलबेल नाही, अशी चर्चा सुरू आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) खासदार पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. कोणालाही सुगावा लागू न देता पार्थ पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांचे भेट घेतल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री १० वाजता पार्थ पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर पोहोचले. पार्थ पवार हे एकटेच वर्षा बंगल्यावर गेले होते, त्यांच्यासोबत कोणताही राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता किंवा इतर सहकारी उपस्थित नव्हता. मुख्यमंत्री फडणवीस आणि पार्थ पवार यांच्यात तब्बल पाऊण तास चर्चा झाल्याचं समजते. मात्र, भेटीचं अधिकृत कारण अद्याप पूर्णपणे गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. पण, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

२९ एप्रिल रोजी राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या स्वाक्षरीने निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने खळबळ उडाली होती.

पटेल यांचा राज्यसभेतील पक्षनेते आणि तटकरे यांचा लोकसभेतील पक्षनेते असा उल्लेख होता; मात्र राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष ही पदनामे नमूद नव्हती. त्यामुळे त्यांना पक्षाच्या संघटनात्मक कामकाजातून दूर केल्याची चर्चा सुरू झाली होती.

पण, शनिवारी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न पक्षातर्फे करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे आपल्या पदांवर कायम असून त्यांच्याकडे पूर्वीप्रमाणेच पूर्ण अधिकार आहेत, असे स्पष्टीकरण पक्षाने दिले आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गतच असलेले संभ्रमाचे वातावरण निवळले आहे.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक आणि उमेश पाटील यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेल्या पत्रातील त्रुटीमुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले. त्यांनी ही "कारकुनी चूक" असल्याचे स्पष्ट करत लवकरच सुधारित पत्र निवडणूक आयोगाला पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.