SIT तपासादरम्यान संशयित कर्मचाऱ्यांची सुटका?
परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरण
अमरावती : खरा पंचनामा
परतवाडा येथील लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात धक्कादायक घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात तपास करणाऱ्या SIT चे काम पूर्ण होण्यापूर्वीच तत्कालीन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी तीन संशयित पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयातून थेट मूळ पोलीस स्टेशनला परत पाठवले आहे.३० एप्रिल रोजी काढलेल्या आदेशाने तपास यंत्रणेच्या निष्पक्षतेवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
परतवाडा प्रकरणाच्या तपासावर परिणाम होऊ नये यासाठी तिघांना अमरावती ग्रामीण पोलीस मुख्यालयाच्या पोलीस नियंत्रण कक्षाला अटॅच करण्यात आले होते. पोहवा/१४८९ पुरुषोत्तम मधुकर बावनेर (पो.स्टे. अचलपूर), पोहवा/१९६९ मोहन धनराज वावरे (पो.स्टे. अचलपूर) आणि पोहवा/४१७अब्दुल नाझीम अब्दुल करीम (पो.स्टे. परतवाडा). SIT तपास सुरू असतानाच या तिघांना मूळ स्थानावर परत पाठवणे हे अनेक प्रश्न उपस्थित करणारे आहे.
तत्कालीन पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी काढलेल्या आदेशात या कर्मचाऱ्यांना परत का पाठवले याचे कोणतेही कारण नमूद नाही. SIT तपास पूर्ण होण्यापूर्वी संशयित कर्मचाऱ्यांना मूळ स्थानावर पाठवणे म्हणजे चौकशी समिती किंवा चौकशी प्रभावित होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांचा चौकशीत हस्तक्षेप होऊ नये म्हणून त्यांना अटॅच केले होते. मग SIT चा तपास पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची सुटका कशासाठी? हे तीनही कर्मचारी दोषमुक्त झाले का, असा सवाल आता उपस्थित होत आहे. लैंगिक अत्याचारासारख्या संवेदनशील प्रकरणात SIT गठीत करण्यात येते ती तपासाची निष्पक्षता राखण्यासाठी. मात्र तपास पूर्ण होण्यापूर्वीच संशयित कर्मचाऱ्यांना मूळ स्थानावर परत पाठवणे हे तपासाला खो देण्यासारखे असून कोणाच्या दबावाखाली हा आदेश काढण्यात आला, हा प्रश्न अनुत्तरित आहे. 'या संदर्भात नूतन पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना विचारले असता या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन प्रतिक्रिया देणे उचित ठरेल असे स्पष्ट केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.