Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निकाल लागताच पश्चिम बंगाल पेटलं, अनेक ठिकाणी जाळपोळ TMC आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले

निकाल लागताच पश्चिम बंगाल पेटलं, अनेक ठिकाणी जाळपोळ 
TMC आणि भाजपचे कार्यकर्ते भिडले 

कोलकाता : खरा पंचनामा 

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने मोठी मुसंडी मारत विजयाचा झेंडा फडकवला आहे. मात्र, या विजयाच्या आनंदापेक्षा राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांनी संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.

मतमोजणी केंद्रांपासून ते राजकीय पक्षांच्या कार्यालयांपर्यंत अनेक ठिकाणी भाजप आणि तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) कार्यकर्ते एकमेकांशी भिडल्याचे चित्र समोर आले आहे. अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.

बैरकपूर येथील मतमोजणी केंद्राबाहेर आज मोठा राडा झाला. भाजप कार्यकर्त्यांवर हिंसाचार केल्याचा आरोप टीएमसीकडून करण्यात आला आहे. विजयी जल्लोष करताना भाजप कार्यकर्त्यांनी आणि टीएमसीच्या समर्थकांमध्ये हमरी-तुमरी झाली त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.

आसनसोलमध्ये तर हिंसाचाराने भीषण रूप धारण केले आहे. येथे टीएमसीच्या कार्यालयाला आग लावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भाजप कार्यकर्त्यांनीच ही जाळपोळ केल्याचा आरोप स्थानिक टीएमसी नेत्यांनी केला आहे. केवळ आसनसोलच नाही, तर दिनहाटा आणि बांकुरा या ठिकाणीही मोठा गोंधळ पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी टीएसीच्या नेत्यांच्या घराबाहेर घोषणाबाजी करण्यात आली असून, सामान्य नागरिक दहशतीच्या छायेत आहेत.

भाजपने बंगालमध्ये मिळवलेला हा विजय ऐतिहासिक मानला जात असला, तरी कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहामुळे आणि दोन्ही पक्षांमधील वैमनस्यामुळे या यशाला हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. राज्यभरातून भाजप कार्यकर्त्यांवर हिंसाचाराचे आरोप होत असताना, भाजपने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर संभाव्य हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी महत्त्वाचे वक्तव्य करत म्हटले की पश्चिम बंगालमध्ये आज संध्याकाळपर्यंत सर्व काही सुरळीत होईल, ही टिप्पणी अशा वेळी आली आहे, जेव्हा राज्यात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून हिंसाचाराच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. या याचिकेत निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर संभाव्य हिंसाचार टाळण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली मॉनिटरिंग कमिटी स्थापन करण्याची मागणीही करण्यात आली होती.

मात्र सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात थेट हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिकाकर्त्याला संबंधित उच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. सुनावणीदरम्यान वरिष्ठ वकील व्ही. व्ही. गिरी यांनी न्यायालयात युक्तिवाद करत सांगितले की निकाल जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोग आपली जबाबदारी झटकू शकतो. ज्यामुळे कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. यावर निवडणूक आयोगाच्या वतीने उपस्थित वरिष्ठ वकील डी.एस. नायडू यांनी स्पष्ट केले की मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाची भूमिका संपते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.