कोयना धरणात अवघा 9 टीएमसी पाणीसाठा
जलसमाधी घेतलेली ऐतिहासिक मंदिरं अन् गावं आली उघड्यावर

सातारा : खरा पंचनामा 

अनेक वर्षांनंतर सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातील पाण्याची पातळी अत्यंत खालावली असून, धरणाच्या पाण्याची भीषणता समोर आली आहे. तब्बल 105.25 टीएमसी साठवण क्षमता असलेल्या या अवाढव्य धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा घटून अवघा 9 टीएमसीवर आला आहे.
धरणाची पातळी झपाट्याने घटल्याने अनेक वर्षांपूर्वी पाण्याखाली गेलेली, जलसमाधी घेतलेली प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरे आता पूर्णपणे उघड्यावर आली आहेत. धरण बांधताना ज्या गावांनी जलसमाधी घेतली होती, त्या गावांच्या घरांच्या आणि वाड्यांच्या खुणा पाणी आटल्यामुळे पुन्हा एकदा जिवंत झाल्या आहेत. कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'नवजा' गावातील ग्रामदैवत मानाईदेवी मंदिराचे अवशेष आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत.

धरणाच्या अंतर्गत भागातील आणि उघड्या पडलेल्या मंदिरांची ही अद्भूत आणि दुर्मिळ दृश्ये ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. इतिहासाचे साक्षीदार असलेल्या या ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरांचे अवशेष पाहण्यासाठी कोयना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. उघड्या पडलेल्या या वास्तू एकीकडे पर्यटकांमध्ये मोठे कुतूहल निर्माण करत असल्या, तरी दुसरीकडे घटणारा पाणीसाठा स्थानिक प्रशासनाची चिंता वाढवत आहे.

मान्सून लांबल्यास किंवा पावसाने ओढ दिल्यास हा घटलेला पाणीसाठा मोठ्या जलसंकटाची गंभीर घंटा वाजवत आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात लवकरात लवकर जोरदार पाऊस सुरू होऊन धरणातील पाणीसाठ्यात वाढ व्हावी, यासाठी आता बळीराजासह संपूर्ण सातारा जिल्हा डोळे लावून बसला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.