"लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं"
मुंबई : खरा पंचनामा
शिवसेना शिंदे गटात ठाकरे गटाचे 6 खासदार दाखल होणार आहेत. त्यांच्या गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजूरीही दिली. काल रात्रीच ही प्रक्रिया पार पडली. एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्षांची भेट राजस्थानमध्ये घेतली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे महत्वाचे नेतेही दिल्लीत आहेत. शिवसेना ठाकरे गटातून तब्बल 6 खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जात असल्याने हा मोठा धक्का उद्धव ठाकरे यांना म्हणावा लागेल. शिवसेना ठाकरे गटाकडून खासदारांना व्हिप जारी करण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत. काल चार्टर विमानाने या खासदारांना दिल्लीत नेण्यात आले. राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आल्याचे बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाकडून गंभीर आरोप केले जात आहेत.
यादरम्यानच आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केला. रोहित पवार यांनी म्हटले की, लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं... हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला 'ऑपरेशन टायगर' नाही ऑपरेशन बाजार' म्हणावं लागेल आणि हा ऑपरेशन बाजार लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील.
एकेका खासदाराचा रेट 85 कोटी..??? एवढे पैसे द्यायला संबंधित पक्षाकडं पैसे येतात तरी कुठून? शिवसेना, राष्ट्रवादी, आप, तृणमूल काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना.. देशात हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस लोकंच रस्त्यावर उतरून पळून जाणाऱ्यांना आणि पळवून नेणाऱ्यांना चोपल्याशिवाय राहणार नाहीत.
आज डोक्यावर दुष्काळाचं सावट आहे, पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी नाही, मालाला भाव नाही, बेरोजगारी वाढलीय, नोकरभरतीचा बट्ट्याबोळ केलाय, मध्यमवर्गीयांना ईएमआय भरण्यासाठी पैसे नाहीत आणि अशा परिस्थितीत सामान्य माणूस कधी नाही एवढा अडचणीत असताना यावर मात्र चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.