"गुन्हेगार असेल तर फाशी द्या, रस्त्यावर तमाशा कशासाठी?"
कोलकाता : खरा पंचनामा
"पोलीस आरोपींना अटक करू शकतात आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. जर ते दोषी आढळले, तर न्यायालय त्यांना फाशीची शिक्षाही देऊ शकते. परंतु, अटकेच्या नावाखाली पोलीस जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीचा आत्मसन्मान आणि मानवाधिकार पायदळी तुडवू शकत नाहीत.
एखादा व्यक्ती गुन्हेगार असल्याचा आरोप असला, तरी त्याचे मूलभूत हक्क संपत नाहीत," अशा शब्दांमध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह गृह विभागाला फटकारले. पोलिसांनी कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी आणि कोणत्याही आरोपीचा सार्वजनिक छळ किंवा अपमान केला जाऊ शकत नाही, असेही यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले.
गुन्हेगारीविरुद्धच्या कारवाईच्या नावाखाली काही प्रकरणांमध्ये पोलिसांनी कायदेशीर मर्यादा ओलांडल्याचा आरोप करत कलकत्ता उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. यावर कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जॉयसेन गुप्ता आणि न्यायमूर्ती मीता दास यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी (दि. ५) सुनावणी झाली.
सुनावणीदरम्यान हायकोर्टाने कायदेशीर कारवाई आणि जाहीर अपमान यातील फरक स्पष्ट केला. राज्य सरकारला गुन्हेगारांना अटक करण्याचा आणि त्यांच्यावर खटला चालवण्याचा पूर्ण अधिकार आहे, परंतु त्यांना अपमानित करण्याचा अधिकार नाही. कारवाई करण्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीची प्रतिष्ठा आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करता येणार नाही, असे नमूद करत आरोपींच्या कमरेला दोरी बांधून त्यांना जाहीरपणे रस्त्यावरून फिरवण्याच्या पोलिसांच्या कथित पद्धतीवर न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली.
पोलिसांच्या या भूमिकेवर तीव्र शब्दांत टीका करताना न्यायमूर्ती जॉय सेनगुप्ता म्हणाले, "पोलीस आरोपींना अटक करू शकतात आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. ते दोषी आढळले, तर न्यायालय त्यांना फाशीची शिक्षाही देऊ शकते. परंतु, अटकेच्या नावाखाली पोलीस जाणीवपूर्वक एखाद्या व्यक्तीचा आत्मसन्मान आणि मानवाधिकार पायदळी तुडवू शकत नाहीत."
या प्रकरणी खंडपीठाने राज्य सरकारला पुढील तीन आठवड्यांत सविस्तर लेखी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी नेमक्या कोणत्या परिस्थितीत किंवा कोणाच्या आदेशावरून कायदा हातात घेऊन आरोपींच्या कमरेला दोरी बांधली आणि त्यांना जाहीरपणे फिरवले, याचे स्पष्टीकरण या प्रतिज्ञापत्रात द्यावे लागणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.