Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; 'या' कारणामुळे सरकारचा मोठा निर्णय

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; 'या' कारणामुळे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : खरा पंचनामा 

अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळविरोधी धडक मोहीम राबवून चर्चेत आलेले वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांना राज्य सरकारने आणखी एक प्रशासकीय धक्का दिला आहे.

परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदावरून त्यांची उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून तुकाराम मुंडे यांच्या कारवाईची राज्यभरात चर्चा सुरू होती. अन्न, औषधे, दूध, खवा आणि इतर खाद्यपदार्थांमधील भेसळीविरोधात त्यांनी कठोर भूमिका घेत अनेक ठिकाणी छापेमारी मोहीम राबवली. या कारवाईत अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर काही आरोपींना तुरुंगातही पाठवण्यात आले. मोठ्या उद्योगसमूहांपासून ते नामांकित हॉटेल्सपर्यंत कारवाईचा बडगा उगारत मुंडे यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाडली होती.

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने त्यांची अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नियुक्ती केली होती. सुरुवातीला हे पद त्यांच्या दर्जाच्या तुलनेत कमी महत्त्वाचे असल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंडे या नियुक्तीबाबत फारसे समाधानी नसल्याचेही वृत्त समोर आले होते. मात्र सरकारने अन्यत्र बदलीची मागणी फेटाळल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारताच विभागात आक्रमक कामकाज सुरू केले.

दरम्यान, त्यांच्या कार्यपद्धतीवर काही स्तरांतून मनमानी कारभाराचे आरोपही करण्यात आले. त्यामुळे त्यांची पुन्हा बदली व्हावी यासाठी काही नाराज गट प्रयत्नशील असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. अशा परिस्थितीत राज्य सरकारने परभणीच्या पालक सचिवपदावरून त्यांची हकालपट्टी केल्याने प्रशासकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्काना उधाण आले आहे.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक सचिवांची नियुक्ती केली जाते. जिल्ह्याच्या विकासकामांवर लक्ष ठेवणे, स्थानिक प्रशासन आणि राज्य शासन यांच्यात समन्वय साधणे तसेच पालकमंत्र्यांना प्रशासकीय पातळीवर सहकार्य करणे ही पालक सचिवांची प्रमुख जबाबदारी असते. जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्यातही पालक सचिवांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

तुकाराम मुंडे हे यापूर्वी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव असताना त्यांच्याकडे परभणी जिल्ह्याच्या पालक सचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र दिव्यांग कल्याण विभागातून त्यांची बदली झाल्यानंतर आता पालक सचिवपदही काढून घेण्यात आले आहे.

राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, परभणी जिल्ह्याचे नवे पालक सचिव म्हणून ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अकोला जिल्ह्याच्या पालक सचिवपदी कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

तुकाराम मुंडे यांच्यावरील ही कारवाई केवळ नियमित प्रशासकीय फेरबदलाचा भाग आहे की त्यामागे अन्य काही कारणे आहेत, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र त्यांच्या धडक कारवायांनंतर झालेल्या या निर्णयामुळे राज्यातील प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.