सांगलीत नशेसाठी साठा केलेली 'ट्रेमीमाईड'ची ८४ इंजेक्शन्स जप्त
सांगलीवाडीतून एकाला अटक, 'एलसीबी'ची मोठी कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
तरुणांमध्ये नशेसाठी आणि उत्तेजक द्रव्य म्हणून बेकायदेशीररित्या वापरल्या जाणाऱ्या 'मेफेन टरमाईन' (Mephentermine Sulphate) या औषधी द्रव्याच्या ८४ इंजेक्शन्सचा साठा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) सापळा रचून जप्त केला आहे. या कारवाईत एका २३ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून इंजेक्शन्स आणि मोबाईलसह एकूण ५६,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील नशेखोरीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी बेकायदेशीर औषध साठा व विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते.
या दरम्यान, सांगलीवाडी टोलनाक्यासमोरील फल्ले मंगल कार्यालयाजवळ एक इसम नशेशी संबंधित इंजेक्शन्स विकण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती 'एलसीबी'चे पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाला मिळाली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या परिसरात पाळत ठेवली. तिथे एका संशयास्पद तरुणाला ताब्यात घेऊन त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्याच्याकडील कापडी पिशवीत 'ट्रेमीमाईड' (Tremimide) औषधी द्रव्याच्या ८४ इंजेक्शन्सच्या बाटल्या आढळून आल्या.
आरोपीचे नाव राहुल सहदेव अडगळे (वय २३ वर्षे, रा. जोतीबा मंदिरामागे, समडोळी रोड, सांगलीवाडी, ता. मिरज, जि. सांगली) असे असून जप्त मुद्देमालमध्ये 'Mephentermine sulphate' १० मिलीची ६० नग इंजेक्शन्स, 'Mephentermine sulphate 30mg' ची २० नग इंजेक्शन्स, लेबल नसलेल्या ४ काचेच्या बाटल्या, ३०,००० रुपये किमतीचा आयफोन-११ मोबाईल फोन असा ५६ हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी आरोपीकडे परवान्याबाबत विचारणा केली असता, त्याच्याकडे कोणताही वैध परवाना नव्हता. अधिक चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा केला. तो ही इंजेक्शन्स 'इंडिया मार्ट' (IndiaMART) ॲप्लिकेशनवर गुगल सर्च करून 'कॅश ऑन डिलिव्हरी'द्वारे मागवायचा. जिम करणारे आणि इतर तरुण वर्ग याचा वापर नशा व उत्तेजक द्रव्य म्हणून करत असल्याने, त्यांना जादा दराने विकून नफा कमवण्यासाठी त्याने हा साठा आणल्याची कबुली दिली.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार, कुमार पाटील आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अंमलदारांनी केली आहे.
याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.