तुकाराम मुंढे यांचा खासगी रुग्णालयातील औषध दुकानाला दणका; २० लाखांची औषधे जप्त
नागपूर : खरा पंचनामा
नागपुरातील न्यू एरा रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरमध्ये विनापरवाना औषधसाठा ठेवल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत सुमारे २०.१५ लाख रुपयांचा औषधसाठा जप्त केला.
आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर झालेल्या तपासणीत रुग्णांना विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे घेण्यास भाग पाडणे, औषधविक्री नियमांचे उल्लंघन आणि अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत.
अन्न व औषध प्रशासनाला न्यू एरा रुग्णालयाच्या मेडिकल स्टोअरबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर २७ जून रोजी तपासणी करण्यात आली. या तपासणीत रुग्णालयाच्या तळघरात विनापरवाना जागेत मोठ्या प्रमाणावर औषधसाठा ठेवण्यात आल्याचे आढळले. संबंधित जागेचा वैध औषधविक्री परवाना तसेच औषधांच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे सादर करता आली नाहीत. त्यामुळे सुमारे २० लाख १५ हजार २९० रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला. दोन औषधांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून औषधे व सौंदर्यप्रसाधने कायद्यानुसार पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
तपासणीदरम्यान रुग्णालयातील आंतररुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांचे प्रिस्क्रिप्शन रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना न देता संगणकीय प्रणालीद्वारे थेट मेडिकल स्टोअरला पाठविले जात असल्याचे आढळले. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयाशी संलग्न मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचे निदर्शनास आले.
अन्न व औषध प्रशासनाने १२ जून रोजी रुग्णांना कोणत्याही विशिष्ट मेडिकलमधून औषधे खरेदी करण्याची सक्ती करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र न्यू एरा रुग्णालयात या आदेशाचे पालन होत नसल्याचे तपासणीत समोर आले. तसेच रुग्णांना त्यांच्या निवडीचा अधिकार असल्याची सूचना दर्शविणारा फलकही लावलेला नव्हता.
तपासणीत केमिस्ट आणि ड्रगिस्टचे नाव फलकावर नसणे, मुदतबाह्य औषधांसाठी स्वतंत्र व्यवस्था नसणे, 'शेड्यूल एच-१' औषधांच्या खरेदी-विक्री व साठ्यात तफावत, तसेच तपासणी पुस्तक उपलब्ध नसणे अशा अनेक त्रुटी आढळल्या. याप्रकरणी रुग्णालयाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि योग्य दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगितले. औषधे कुठून खरेदी करायची हा प्रत्येक रुग्णाचा मूलभूत अधिकार असून कोणत्याही रुग्णालयाने विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे घेण्याची सक्ती केल्यास किंवा प्रिस्क्रिप्शन देण्यास नकार दिल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे अथवा टोल-फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
"न्यू ईरा रुग्णालयात कोणत्याही रुग्णाला विशिष्ट औषध दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जात नाही. या प्रकरणात काही गैरसमज झाला असावा. आमच्याकडे पुरवठादाराने औषधे तळमजल्यावर ठेवली होती. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे ती औषध दुकानात हलवण्यापूर्वीच एफडीएने कारवाई केली. रुग्णालयात औषधे चुकीच्या ठिकाणी ठेवली जात नाहीत. याबाबतची आमची भूमिका आम्ही एफडीएसमोर मांडणार आहोत." - विकास मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी, न्यू ईरा रुग्णालय
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.