Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुन्हेगारांचे कंबरडं मोडणार; व्हिजिबल पोलिसिंगवर अधिक भर देणार दोन अधिकाऱ्यांना वेतन रोखण्याच्या नोटीसा : रंजनकुमार शर्मा

गुन्हेगारांचे कंबरडं मोडणार; व्हिजिबल पोलिसिंगवर अधिक भर देणार 
दोन अधिकाऱ्यांना वेतन रोखण्याच्या नोटीसा : रंजनकुमार शर्मा 

सांगली : खरा पंचनामा 

खून, दरोड्यासह गंभीर गुन्ह्यात अधिकारी, अंमलदारांनी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांचे थेट निलंबन करण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर परिक्षेत्राचे नूतन विशेष पोलिस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. सांगली गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी गुंडाविरोधी पथकासह ठोस ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. तसेच व्हिजिबल पोलिसिंगवर अधिक भर दिला जाईल.  वेदांत बंडगर खून प्रकरणात दोन अधिकाऱ्यांना वेतन वाढ का रोखू नये अशा नोटीसा बजावण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महानिरीक्षक शर्मा हे आज गुरुवारी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर ते आले होते. त्यांनी संजयनगर पोलिस ठाण्यास भेट दिली. त्यानंतर पोलिस मुख्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर अधीक्षक कल्पना बारवकर, सांगलीचे उपविभागीय अधिकारी संदीप भागवत, मिरजेचे उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा, एलसीबीचे निरीक्षक संजीव झाडे उपस्थित होते.

महानिरीक्षक शर्मा म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला आहे. संजयनगरमध्ये बंडगर खून प्रकरण मनाला वेदना देणारे आहे. त्याचाही आढावा घेतला असून नऊ आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत. त्या टोळीला लवकरच मोकातंर्गत कारवाईचा बडगा उगारला जाईल. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही. अशा प्रकरणांसह गंभीर गुन्ह्यात जर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला, तर त्यांचे निलंबन केले जाईल. लोकांना सुरक्षित वाटणारे पोलिसिंग झाले पाहिजे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.’’ ते म्हणाले,‘‘गुन्हेगारी, नशेखोरी रोखण्यासाठी आता ठोस ॲक्शन प्लॅन असले. पोलिस रस्त्यावर उतरून कारवाई करतील, अशा सूचना प्रत्येक पोलिस ठाण्यास दिल्या आहेत. कोणचाही गय केली जाणार नाही. 

व्हिजिबल पोलिसिंगवर प्राधान्याने भर दिला जाईल. येणाऱ्या काही महिन्यांत सांगलीकरांना हे दिसून येईल. महिला सुरक्षा विषयी देखील कडक भूमिका पोलिसांची असेल.’’ कॅफेबाबत बोलताना श्री. शर्मा म्हणाले,‘‘कॅफेत काही गैरप्रकार होताहेत. त्यांच्यावर अधीक्षक दोशी यांनी कारवाई सुरू केली आहे. परंतू जिल्हाधिकारी यांच्या पुढाकारातून एक नियमावली जारी होईल. त्यातून करवाई केली जाईल.’’

महानिरीक्षक शर्मा म्हणाले,‘‘बंडगर खून प्रकरणी गांभिर्याने दखल घेण्यात आली आहे. संजयनगरचे निरीक्षक सतीश कदम आणि कवठेमहांकाळ पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक संदीप कोळेकर यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे. तसेच दोन वर्षाची वेतनवाढ का रोखू नये, अशी नोटीस दिली आहे. त्यांचे उत्तर प्राप्त होताच, पुढील कारवाई केली जाईल.’’

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.