Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तोंडात सुतळी बॉम्ब, इंकलाब जिंदाबादाच्या घोषणामंत्रालयाजवळच्या झाडावर चढून तरुण शेतकऱ्याचं थरारक आंदोलन

तोंडात सुतळी बॉम्ब, इंकलाब जिंदाबादाच्या घोषणा
मंत्रालयाजवळच्या झाडावर चढून तरुण शेतकऱ्याचं थरारक आंदोलन

मुंबई : खरा पंचनामा 

मुंबईतील मंत्रालय परिसरात गुरुवारी एक नाट्यमय प्रकार घडला. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील एका तरुणाने मंत्रालयाजवळ असलेल्या झाडावर चढून आंदोलन सुरू केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याशेजारी असलेल्या झाडावर चढलेल्या या तरुणाने सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. "इंकलाब जिंदाबाद" च्या घोषणा देत त्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आंदोलन करणाऱ्या तरुणाने स्वतःची ओळख श्रीराम तुकाराम अशी सांगितली. तो लातूर जिल्ह्यातील असून स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्याचे त्याने सांगितले. आपल्या कुटुंबावर सुमारे 8 लाख रुपयांचे कर्ज असल्याचा दावा करत राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी त्याने केली.

घटनेदरम्यान तरुणाने झाडावरून सुतळी बॉम्ब खाली फेकत सरकारचा निषेध नोंदवला. सुरुवातीला त्याने गळ्याला दोरीचा फासही लावल्याने पोलिस आणि प्रशासनाची चिंता वाढली होती. मात्र नंतर समुपदेशनानंतर त्याने गळ्यातील फास काढल्याची माहिती मिळाली.

घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांकडून तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होते. दरम्यान, आंदोलकाने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली.

या चर्चेनंतर तरुण खाली उतरण्यास तयार झाला. मात्र खाली उतरताना तोंडात सुतळी बॉम्ब ठेवणार असल्याचा इशारा त्याने दिला. तसेच कोणी जबरदस्तीने हात लावल्यास मी स्वतःला पेटवून घेईल, अशी भूमिका त्याने घेतल्याने पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली.

या घटनेमुळे मंत्रालय परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून या आंदोलनाची राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.