Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोयत्याचा धाक दाखवून लुटणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, ८ गुन्हे उघड!सांगलीत एलसीबीची धडक कारवाई

कोयत्याचा धाक दाखवून लुटणारा सराईत गुन्हेगार जेरबंद, ८ गुन्हे उघड!
सांगलीत एलसीबीची धडक कारवाई

पूजा फडके 
सांगली : खरा पंचनामा 

चिंचणी वांगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवराष्ट्रे येथे घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत महिलांचे दागिने जबरदस्तीने चोरणाऱ्या टोळीतील प्रमुख सराईत आरोपीला सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB)  चाणाक्षपणे सापळा रचून अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली.

करण ऊर्फ करंज रज्जा शिंदे (वय १९, रा. हुबालवाडी, ता. वाळवा, जि. सांगली)असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस तपासात या आरोपीने सांगली आणि सातारा जिल्ह्यातील  ८ गंभीर गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्याच्याकडून ८,५०,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
गत १२ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथील रहिवासी बाबूराव बलभीम सुतार यांच्या घरात दोन अज्ञात इसमांनी प्रवेश केला होता. आरोपींनी घरातील महिला व मुलांना कोयत्याचा धाक दाखवून गळ्यातील मणीमंगळसूत्र, बोरमाळ व कर्णफुले जबरदस्तीने ओरबाडून नेली होती. या धक्कादायक घटनेनंतर चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परिसरातील वाढत्या जबरी चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सांगलीचे पोलीस अधीक्षक  तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला तातडीने तपासाचे आदेश दिले. एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार केले. १८ जून २०२६ रोजी हे पथक तासगाव भागात पेट्रोलिंग करत असताना, पथकातील उदयसिंह माळी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. 'देवराष्ट्रे येथील गुन्ह्यातील एक संशयित इसम तासगावमधील पाचवा मैल परिसरात फिरत आहे', अशी खात्रीशीर माहिती मिळताच पथकाने तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकून करण शिंदे याला ताब्यात घेतले.

आरोपीची अंगझडती आणि कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या ५ साथीदारांच्या मदतीने सांगली व सातारा जिल्ह्यात केलेल्या ८ गुन्ह्यांची कबुली दिली. 

पोलिसांनी त्याच्याकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
सोन्याचे दागिने : ५५ ग्रॅम वजनाचे मणीमंगळसूत्र, गंठण, बोरमाळ, कर्णफुले, अंगठी (किंमत रु. ८,००,०००/-)
मोटार सायकल: गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर (किंमत रु. ५०,०००/-)
एकूण जप्त मुद्देमाल: ८,५०,०००/- रुपये

उघडकीस आलेले ८ गुन्हे पुढीलप्रमाणे:
चिंचणी वांगी : देवराष्ट्रे येथे कोयत्याचा धाक दाखवून सोन्याची जबरी चोरी.
कुंडल : किर्लोस्करवाडी येथे घरात घुसून धाक दाखवत सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी.
पलूस : नागराळे येथे चाकूचा धाक दाखवून रोख रक्कम व दागिने लुटले.
पलूस : बुर्ली येथे घराचे कुलूप तोडून (घरफोडी) सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास.
आष्टा : वाळवा येथे घराचा ग्रिल दरवाजा उघडून घरफोडी.
आष्टा :  बहादूरवाडी येथे घरात घुसून सोन्याचे दागिने चोरले.
कुरळप : वशी (ता. वाळवा) येथे घराचा दरवाजा उघडून सोन्याचे दागिने चोरले.
सातारा शहर : सातारा येथून संदीप देशमुख यांची चोरी केलेली स्प्लेंडर मोटार सायकल हस्तगत.

इतर ५ साथीदारांचा शोध सुरू
पोलीस तपासात आरोपी करण शिंदे याच्यासोबत गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर ५ साथीदारांची नावे निष्पन्न झाली असून पोलीस त्यांचा अत्यंत वेगाने शोध घेत आहेत. हे सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर सांगली व शेजारील जिल्ह्यांत खुनासह दरोडा, घरफोडी, आणि मोका (MCOCA) सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र यादव, सपोनि राहुल घुगे, पोउपनि योगेश शेलार, उदयसिंह माळी, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, अरुण पाटील, सतिश माने, अमर नरळे, सुरज थोरात, विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर, संकेत कानडे, सुशांत चिले, चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचे विक्रम कुंभार, विनायक सावळगे, प्रविण मलमे, सायबर पोलीस ठाण्याचे सतिश अलदर, करण परदेशी, विजय पाटणकर, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि राजेंद्र यादव करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.