मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद, ५ दुचाकींसह २.५ लाखांचा मुद्देमाल जप्त!
सांगली एलसीबीची धडक कारवाई
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका आंतर-तालुका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन तरुण आरोपींसह एका विधीसंघर्ष बालकाला (बालअपचारी) ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून अडीच लाख रुपये किमतीच्या ५ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. यामुळे तासगाव आणि विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल ४ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ऋतुराज कुमार मंडले (वय १९) आणि अनिकेत संजय चव्हाण (वय १९, दोघे रा. पेठ बिरोबा नगर, तासगाव) यांना अटक केली असून, त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले आहे.
सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी एक विशेष पथक तयार केले होते. २१ जून २०२६ रोजी पथकातील पोलीस अंमलदार सागर टिंगरे आणि दरिबा बंडगर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, तासगाव ते गोटेवाडी रोडवरील एम एम पार्कजवळ तीन मुले चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी येणार आहेत.
माहिती मिळताच एलसीबीच्या पथकाने एम. एम. पार्क परिसरात पाळत ठेवली. त्यावेळी विना नंबर प्लेटच्या काळ्या रंगाच्या स्प्लेण्डर मोटारसायकलसह तीन संशयित उभे असलेले दिसले. पोलिसांनी त्यांना पळून जाण्याची संधी न देता अत्यंत चाणाक्षपणे ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. परंतु, पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी ही मोटारसायकल तासगावमधून चोरी केल्याची कबुली दिली.
विटा आणि तासगाव परिसरातील ४ गुन्हे उघड
आरोपींनी मागील काही दिवसांत सावळज, विटा, पळशी आणि हिवरे या भागातून आणखी ४ मोटारसायकली चोरल्या होत्या आणि त्या विकण्यासाठी एम एम पार्कच्या कमानीच्या आडोशाला लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी तात्काळ पंचांसमक्ष सर्व ५ मोटारसायकली (किंमत रु. २,५०,०००/-) जप्त केल्या. या कारवाईमुळे तासगाव पोलीस ठाण्यातील ३ आणि विटा पोलीस ठाण्यातील १ असे एकूण ४ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
पुढील तपासासाठी आरोपींना आणि जप्त केलेल्या मुद्देमालाला तासगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर टिंगरे, प्रकाश पाटील, अतुल माने, सतीश माने, अमर नरळे, सायबर पोलीस ठाण्याचे कॅप्टन गुंडवाडे व इतर सहकाऱ्यांच्या पथकाने केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.