एकाच प्रकरणात वारंवार न्यायाधीशांची माघार; न्याय कोण देणार?
CJI सूर्यकांत संतापले; हायकोर्टाला विचारला जाब
नवी दिल्ली : खरा पंचनामा
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात २०२२ पासून प्रलंबित असलेल्या एका याचिकेत न्यायाधीश सातत्याने स्वतःला खटल्यापासून दूर करत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
या प्रकरणात उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शील नागू यांचाही समावेश असल्याने प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने याबाबत कठोर भूमिका घेत उच्च न्यायालयाला द्विसदस्यीय खंडपीठ स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.
या याचिकेचा संबंध न्यायिक अधिकारी अमरीश कुमार जैन यांच्या पदावरून हटवण्याशी आहे. आतापर्यंत उच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांनी या खटल्याच्या सुनावणीतून स्वतःला माघार घेतली आहे. यामुळे याचिकाकर्ते निराश झाले असून, त्यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाकडे दिल्ली उच्च न्यायालयात प्रकरण हस्तांतरित करण्याची विनंती केली.
जैन यांनी सर्वोच्च न्यायालयाला उपलब्ध असलेल्या विशेष अधिकारांचा वापर करून न्याय मिळवण्याची मागणी केली. त्यांचा आरोप आहे की, न्यायाधीशांच्या सतत माघारीमुळे उच्च न्यायालय ही याचिका ऐकण्यास असमर्थ दिसत आहे.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी न्यायाधीशांच्या या वर्तनावर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले की, प्रभारी सरन्यायाधीशांना द्विसदस्यीय खंडपीठ तयार करण्याची विनंती केली जाईल. कोणत्याही वकिलाने किंवा याचिकाकर्त्याने न्यायाधीशांना खटल्यातून माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी कोणतीही युक्ती किंवा लबाडी केल्यास त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी दिला.
सरन्यायाधीश पुढे म्हणाले, "उच्च न्यायालयात गोंधळ घालणारे तीन-चार ज्येष्ठ वकील मला माहित आहेत. खंडपीठातील न्यायाधीशांना मी विनंती करतो की, परिस्थिती कितीही जटिल असली तरी त्यांनी या खटल्यातून माघार घेऊ नये."
सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उच्च न्यायालयातील प्रभारी सरन्यायाधीशांना २०२२ मध्ये दाखल झालेल्या अमरीश कुमार जैन यांच्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी दोन न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करण्याची विनंती केली आहे. न्यायाधीशांनी कोणत्याही परिस्थितीत या प्रकरणातून स्वतःला दूर करू नये, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
१३ जुलैपासून सुरू होणाऱ्या आठवड्यापासून निकाल राखून ठेवला जाईपर्यंत या खंडपीठाने दररोज खटल्याची सुनावणी घेणे आवश्यक आहे. यापूर्वी न्यायमूर्ती लिसा गिल, अश्वनी के. मिश्रा, दीपक सिबल आणि सरन्यायाधीश शील नागू यांनी या खटल्यातून स्वतःला माघार घेतली होती.
या प्रकरणात वकिलांच्या वर्तनावरही सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. एकाच प्रकरणात वारंवार न्यायाधीश माघार घेत असल्याने न्याय मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याचे स्पष्ट दिसते. सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या कठोर भूमिकेमुळे न्यायव्यवस्थेची अब्रू आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे.
उच्च न्यायालय आता या निर्देशांचे पालन करून प्रकरणाचा जलद निकाल लावेल, अशी अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.