"आमच्या हद्दीत आलास तर..."
प्रामाणिक RTO अधिकाऱ्याला वरिष्ठाची दमदाटी
श्रीरामपूर : खरा पंचनामा
शासनाचा महसूल बुडवणाऱ्या अतिअवजड वाहनांवर कायदेशीर कारवाई करणाऱ्या परिवहन विभागातील निरीक्षकाला दमदाटीचा प्रकार घडला. 'आमच्या हद्दीत कारवाई करायची नाही' असा थेट धमकीवजा इशारा वैजापूर आरटीओ कार्यालयाचे प्रभारी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश विघ्ने यांनी श्रीरामपूरच्या पथकाला दिला.
गणेश विघ्ने व योगेश मोरे यांच्यातील संभाषणाची 'ऑडिओ क्लिप' समाज माध्यमांवर सोमवारी व्हायरल झाली. या घटनेची गंभीर दखल परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली असून, कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
श्रीरामपूरच्या वायुवेग (भरारी) पथकातील मोटार वाहन निरीक्षक योगेश मोरे यांनी एका अतिअवजड आणि सलग दोन वर्षे शासनाचा कर चुकवलेल्या वाहनावर धडक कारवाई केली. यात संबंधित वाहनचालकाला ६७ हजार रुपयांचा दंड केला. मात्र या करबुडव्या वाहनचालकाच्या बचावाच्या उद्देशाने बीडचे मोटार वाहन निरीक्षक तथा वैजापूर आरटीओ कार्यालयाचे प्रभारी अधिकारी गणेश विघ्ने यांनी श्रीरामपूर पथकातील अधिकाऱ्यांशी हद्दीवरून जोरदार वाद घातला.
आपल्या पदाचा रुबाब दाखवत विघ्ने यांनी संबंधित अधिकाऱ्याला 'आमच्या हद्दीत येऊन कारवाई का केली?' असा जाब विचारला आणि वैजापूरच्या हद्दीत यापुढे कोणतीही कारवाई न करण्याच्या सूचना दिल्या. यानिमित्ताने आरटीओ विभागातील अंतर्गत राजकारण आणि भ्रष्ट साखळी उघडी पडली आहे.
घडलेला प्रकार अत्यंत चुकीचा आहे. मी परिवहन आयुक्तांना या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. असला गैरप्रकार सहन केला जाणार नाही. दोषींवर नक्कीच कारवाई होईल, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.