गिरीश महाजनांचा प्रचारकच निघाला 160 कोटींच्या घोटाळ्याचा आरोपी
विधानसभेपूर्वीच भाजपप्रवेश करून उभी केली होती तगडी यंत्रणा
जळगाव : खरा पंचनामा
शालार्थ आयडी घोटाळा शिक्षण विभागात भ्रष्टाचाराचा कळस ठरला आहे. त्यामध्ये सत्ताधारी पक्षाशी संबंधित नेतेच अडकल्याचे चित्र आहे. त्यातच आता या घोटाळ्यात भाजप नेता अडकल्याचं समोर आलं आहे. जामनेर (जळगाव) मतदारसंघात बडे राजकीय प्रस्थ असलेले संजय भास्करराव गरुड यांना पोलिसांनी अटक केली. १६० कोटींच्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात ते आरोपी आहेत. गरुड यांच्या अटकेने मंत्री गिरीश महाजन देखील चर्चेत आहेत.
सामनेर येथील शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख म्हणून संजय गरुड काम करीत आहेत. सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी गिरीश महाजन यांच्या विरोधात उमेदवारी केली. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राजकीय सोय म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
जामनेर मतदारसंघात गिरीश महाजन यांचे निवडणुकीतील विरोधक गरुड हेच 2024 मध्ये महाजन यांचे प्रचारक बनले. त्यामुळे गरुड हे सोयीसाठी महाजन यांच्या विरोधात निवडणूक लढवीत होते की खरोखरच विरोधक होते हा चर्चेचा विषय आहे.
महाजन यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठी प्रचार यंत्रणा उभी केली होती. गरुड यांना नाशिकच्या विशेष तपास तथकाने सोलापूर येथून अटक केली. त्यावर महाजन यांनी थेट प्रतिक्रिया देणं टाळले. त्यांना अटक झाल्याचे ऐकले आहे. याबाबत माहिती घेत असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.
गरुड यांनी १५ बोगस संस्थांच्या नावे शालार्थ आयडी तयार केले होते. संस्थांमध्ये १७७ बनावट शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्या माध्यमातून जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयातून अनुदान लाटले. गरुड यांना अटक झाल्याने मंत्री महाजन यांची चांगलीच गैरसोय झाल्याचं बोललं जात आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.