पुढील 48 तास राज्यात धो-धो पाऊस पडणार; अनेक जिल्ह्यांना इशारा
मुंबई : खरा पंचनामा
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात मान्सूनने विश्रांती घेतल्यामुळे पावसाचा खंड पडला होता. परिणामी, राज्यातील अनेक भागांत उकाडा आणि दमट हवामानाची स्थिती निर्माण झाली होती, तसेच शेतीबाबत चिंताही वाढली होती.
मात्र, आता हवामान विभागाने दिलासादायक बातमी दिली आहे. राज्यातील हवामानात बदल होत असून, पावसाच्या दृष्टीने पुढील ४८ तास महत्त्वाचे ठरणार आहेत. १८ जुलैसाठी महाराष्ट्रातील २० जिल्ह्यांत 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे; अनेक भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी आज हवामानाचा कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. काही ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असली तरी, मुसळधार पावसाचा अंदाज नाही. या भागांत आकाश ढगाळ राहण्याची आणि दमट हवामानामुळे उकाडा जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक तसेच घाट माथ्यावरील भागांत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. या भागांसाठी कोणताही विशेष इशारा नसला तरी, हवामान ढगाळ राहील. काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी पडण्याची आणि उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने पुणे, सातारा, अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. या भागांत हलक्या ते मध्यम पावसासह ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सांगली, कोल्हापूर आणि घाट माथ्यावरील भागांतही हलक्या पावसाची शक्यता असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. मराठवाड्यात हवामानात बदल; अनेक जिल्ह्यांसाठी इशारा
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. या भागांत मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि नागरिकांनी सतर्क राहावे.
हवामान विभागाने विदर्भ क्षेत्रातील बहुतांश जिल्ह्यांसाठी 'येलो अलर्ट' जारी केला आहे. अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यांच्या काही भागांत मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच काही ठिकाणी मुसळधार पावसाचाही अंदाज आहे. यासोबतच सोसाट्याचे वारे वाहण्याचीही शक्यता आहे. अकोला, बुलढाणा आणि वाशीम जिल्ह्यांसाठी कोणताही विशिष्ट इशारा देण्यात आलेला नसला तरी, तेथील हवामान अस्थिर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्याच्या अनेक भागांत पावसाची अपेक्षा असली तरी, अद्याप सर्वदूर आणि समाधानकारक पाऊस झालेला नाही; त्यामुळे शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता असून, यामुळे राज्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस पडू शकतो.
शेतकरी, नागरिक आणि प्रवाशांनी हवामान विभागाच्या ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवूनच आपली शेतीविषयक कामे, प्रवास आणि इतर महत्त्वाचे कार्यक्रम यांचे नियोजन करावे. बदलत्या हवामानामुळे पुढील ४८ तास राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.