कोयना धरणाने ओलांडला 60 टीएमसीचा टप्पा !
गेल्या 24 तासांत 2.41 TMC ने वाढ
कराड : खरा पंचनामा
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह महाबळेश्वर परिसरात रविवारीपासून मंगळवारपर्यंत मुसळधार पाऊस सुरू असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणाने ६० टीएमसीचा टप्पा ओलांडला असून, मंगळवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत धरणात ६१.३० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
यंदाच्या मॉन्सूनने २९ जूनपासून सातारा जिल्ह्यात दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर कृष्णा, कोयना तसेच अन्य उपनद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन अनेक ठिकाणी नद्या दुथडी भरून वाहू लागल्या होत्या. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली होती.
शनिवारपासून पावसाने पुन्हा जोर धरल्याने धरणातील पाणीसाठा वेगाने वाढू लागला आहे. सध्या कोयना धरणात २७हजार ९८२ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या २४ तासांत धरणातील पाणीसाठ्यात तब्बल २.४१ टीएमसीची भर पडली आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत नवजा येथे ८५ मिमी, कोयनानगर येथे ६७ मिमी, तर महाबळेश्वर येथे ७८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या पुनरागमनामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.