माझी परवानगी घेतली नाही..!
'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स'वर रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया, कलाकारांवर कायदेशीर कारवाईचा इशारा
मुंबई : खरा पंचनामा
नाशिकचा बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरातचं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. या प्रकरणातील कथित गैरकृत्यांवर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मात्र, या चित्रपटात आपली परवानगी न घेता आपली व्यक्तिरेखा दाखवली जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी चित्रपट निर्मात्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
'महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून, यामध्ये सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांच्याशी साधर्म्य असलेलं पात्र साकारत असल्याची चर्चा आहे. यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर त्याच्यावर सिनेमा बनवता येत नाहीय. सिनेमा बनवला तरी जिवंत व्यक्तीवर आधारित चित्रपट किंवा पात्र साकारताना संबंधित व्यक्तीची लेखी परवानगी घेणं कायद्यानं बंधनकारक असतं. या चित्रपटासाठी माझी कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळं दोन दिवसांत चित्रपट निर्माते आणि संबंधित कलाकारांना कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. असा इशारा चाकरणकरांनी दिलाय.
माध्यमांशी बोलताना रुपाली चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, खरात प्रकरणात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वाट्टेल तसे बिनबुडाचे आरोप करण्यात आले. माझी मुलं सध्या शैक्षणिक क्षेत्रात करिअर करत आहेत, असं असतानाही त्यांना नाहक टार्गेट करण्यात आले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. असंही चाकणकर यांनी म्हटलं.
रुपाली चाकणकर यांनी केवळ चित्रपट निर्मात्यांवरच नाही, तर राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर त्यांची बदनामी करणाऱ्यांवरही कायदेशीर बडगा उगारला आहे. त्यांनी सांगितलं की, पुराव्याशिवाय चिखलफेक करणाऱ्या आशा मिरगे, रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया यांच्यासह काही यूट्यूब चॅनेल्सनाही नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.
"येत्या १० जुलै रोजी मी स्वतः दिल्ली उच्च न्यायालयात या प्रकरणी हजर राहणार आहे. स्त्रीत्वाच्या सन्मानासाठी आणि माझ्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी हा कायदेशीर लढा मी शेवटपर्यंत लढणार आहे," असे चाकणकर यांनी ठामपणे सांगितले.
काही महिन्यांपूर्वी नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात याला महिलांचं शोषण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. या तपास प्रक्रियेदरम्यान रुपाली चाकणकर यांचा एक जुना पाद्यपूजेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यावरून विरोधकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर चाकणकर यांनी आपल्या पदांचे राजीनामेही दिले होते आणि एसआयटी चौकशीला सामोऱ्या गेल्या होत्या. आता या प्रकरणावर आधारित चित्रपट येत असल्याने राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.