Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुमच्याकडे बाईक आहे का? मग सरकारला रोज ५ रुपये द्या आणि कमवा पैसेपरिवहन खात्याचा अजब प्रस्ताव

तुमच्याकडे बाईक आहे का? मग सरकारला रोज ५ रुपये द्या आणि कमवा पैसे
परिवहन खात्याचा अजब प्रस्ताव

मुंबई : खरा पंचनामा 

पर्यावरणपूरक ई-वाहनांना (EV) प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली पेट्रोलवरील बाइक टॅक्सी सेवेला साफ नकार देणाऱ्या राज्य परिवहन विभागाने आता मोठा 'यू-टर्न' घेतला आहे. राज्यात मागच्या दाराने पेट्रोलवरील बाइक टॅक्सी सेवेला अधिकृत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी परिवहन विभागाने एक अत्यंत अजब प्रस्ताव तयार केला आहे.

राज्याला महसूल मिळावा आणि तरुणांना रोजगार मिळावा, या नावाखाली आता प्रत्येक बाइक टॅक्सीचालकाकडून दररोज ५ रुपये महसूल गोळा करण्याचे नियोजन सरकारने केले आहे. सरकारच्या या अजब प्रस्तावामुळे राज्याच्या स्वतःच्याच 'इलेक्ट्रिक वाहन धोरणाला' परिवहन खात्याकडून हरताळ फासला जाण्याची चिन्हे आहे.

राज्यातील अनधिकृत बाइक टॅक्सीच्या समस्येबाबत आमदार दिलीप लांडे, सुनील प्रभू आणि इतर सदस्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. मंत्री सरनाईक यांनी सांगितले की, "बाइक टॅक्सी क्षेत्राचे नियमन करण्यासाठी नवीन नियमावलीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवला आहे. या नव्या व्यवस्थेनुसार चालकांकडून रोज ५ रुपये महसूल, तर प्रत्येक 'राईड'मागे २ रुपये कल्याण निधी गोळा करणे बंधनकारक करण्याचा प्रस्ताव आहे."

विशेष म्हणजे, यापूर्वी मुंबईत ऑटो-टॅक्सी चालकांच्या आंदोलनानंतर याच परिवहन मंत्र्यांनी पेट्रोलवरील बाइक टॅक्सीला ठाम नकार दिला होता. मात्र, आता महसुलाच्या नावाखाली ५ रुपयांचा जुगार खेळत या सेवेला परवानगी देण्याची तयारी सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आता यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

नवीन नियमावलीत महिला, विद्यार्थी आणि अल्पवयीन प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी काही तरतुदी करण्यात आल्या आहेत. बाइक टॅक्सी चालवण्यासाठी चालकाकडे वैध परवाना आणि सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याचे अधिकारपत्र (बॅज) असणे बंधनकारक असेल. महत्त्वाचे म्हणजे, हा बॅज देण्यापूर्वी चालकाची चारित्र्य पडताळणी (Police Verification) केली जाणार आहे. परप्रांतीय तरुणांना परवान्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. त्याशिवाय, परवाना मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.