किड्स पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा
सांगली : खरा पंचनामा
महाराणी देवी अहिल्याबाई होळकर एज्युकेशन सोसायटी संचलित किड्स पॅराडाईज इंग्लिश मीडियम स्कूल, सांगली येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा विद्यार्थी मंत्रिमंडळ (Investiture Ceremony) सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, शिस्त, सेवाभाव आणि जबाबदारीची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास एमआयडीसी, कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी संस्थेच्या प्रशासिका डॉ. मानसी सोनलकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख सौ. सुप्रिया चोपडे तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. दीपाली थोरात यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमात नव्याने निवडून आलेल्या विद्यार्थी मंत्रिमंडळातील पदाधिकाऱ्यांना शपथ देण्यात आली. त्यांना बॅज प्रदान करून नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली.
प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उत्तम आरोग्य, नियमित व्यायाम, खेळाचे महत्त्व, मानसिक स्थैर्य, वाढता ताणतणाव (Anxiety) आणि योग्य मित्रपरिवार व चांगली साथ-संगत यांचे महत्त्व विशद केले. निरोगी शरीर आणि सुदृढ मन हे यशस्वी आयुष्याचे आधारस्तंभ असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलच्या अतिरेकी वापरापासून दूर राहून मैदानी खेळ, वाचन आणि सकारात्मक छंद जोपासण्याचा सल्ला दिला. उपस्थित मान्यवरांनीही विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी अंगीकारून आदर्श नागरिक बनावे, असा संदेश दिला. यावेळी प्रशासिका डॉ. मानसी सोनलकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन आर्यन पोळ आणि तन्वी सदानंद यांनी प्रभावीपणे केले. आभार राशी पवार हिने मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्याध्यपिका दिपाली थोरात, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.